शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा- पालकसचिव, राजगोपाल देवरा

जिल्हास्तरीय कामकाजाबाबत घेतला आढावा, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज करण्याच्या केल्या सूचना

कोल्हापूर, दि.२१ : सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. यात सुरवातीच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत शासन अतिशय गंभीर असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने १०० दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी  करावी, अशा सूचना नियोजन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव तथा पालकसचिव कोल्हापूर, राजगोपाल देवरा यांनी केल्या. ते म्हणाले, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज करा. शासनाची संकेतस्थळे, कार्यालयातील सेवासुविधा तसेच त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सोप्या पद्धतीने नियोजन करा. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सात कलमी कृती आराखड्याबाबत तसेच १०० दिवसांच्या नियोजनाबाबत सादरीकरणातून माहिती दिली. बैठकीला कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजीत म्हेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालक सचिव श्री.देवरा यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महापालिका यांचा सात कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेतला. कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी त्या त्या विभागांचे सादरीकरण केले. यावेळी  ते म्हणाले, सर्व विभागांची संकेतस्थळे सर्वसामान्य जनतेच्या कामाची असावीत. अगदी सहज त्यावरील विविध माहिती, सेवा त्यांना वापरता आल्या पाहिजेत. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांची माहिती आणि त्या घेण्याबाबतच्या लिंक त्यावर असल्याच पाहिजेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या विविध सेवा सहज घेता येतील आणि सर्व संकेतस्थळे मोबाईलवरती वापरण्यासाठी योग्य असावीत. यानंतर त्यांनी कार्यालय स्वच्छता, कार्यालय सोयीसुविधा याबाबत माहिती घेतली. ई ऑफीसबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, महसूल विभागाने यात काम पुर्ण केले आहे. आता राज्य शासनाच्या इतर जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्येही यापद्धतीने येत्या काळात काम करणार आहोत.

जिल्ह्यात गुंतवणूक वाढीस चालना देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवा

ज्या व्यावसायिकांबरोबर सामंजस्य करार झाले आहेत त्यांच्याशी बैठक घेवून सुरु असलेल्या कामकाजाबाबत चर्चा करा. मागील काळात 52 ठिकाणी सामंजस्य करार झाले, त्याचा आढावाही त्यांनी घेतला. ज्यांचे काम सुरु आहे व ज्यांचे अद्याप सुरु नाही अशा कंपनीबरोबर चर्चा करून काही अडचणी असल्यास त्या सोडवा. कारण त्यांना आवश्यक वीज, जागा, मनुष्यबळ, बँक कर्ज तसेच शासन स्तरावरील इतर परवानग्या बाबत काही अडचणी असतील तर त्या सोडवाव्या लागतील. यातून प्रकल्प उभारणीला गती मिळेल. तसेच इतर गुंतवणुकदार यामुळे अधिक सहभाग देतील.

यावेळी पालक सचिव यांनी शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय दौरे करतांना त्या ठिकाणच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांना भेट देणे आणि  शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाचे आणि फिल्ड व्हिजीटचे वेळापत्रक तयार करावे. नागरिकांसोबत संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी निकाली काढाव्यात अशाही सूचना केल्या.

लोकाभिमुख होऊन काम करा

राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची जिल्हा पातळीवर योग्य अंमलबजावणी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. शासन हे लोकाभिमुख असावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा लोकाभिमुख होण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडविणे, आठवड्यातून दोन वेळा क्षेत्र भेटी करणे, गावात गेल्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेणे, आदी बाबी करणे आवश्यक आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रत्येकाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. सर्व विभागांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात चांगले प्रशासन चालवावे. येत्या १०० दिवसात कोल्हापूर जिल्हा प्रशासन नक्कीच चांगले काम करेल, अशी अपेक्षा अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी व्यक्त केली.

००००००००