कोल्हापूर, दि. २१ : राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचवावा तसेच अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वंयपूर्ण व्हावा त्याचबरोबर राज्यातून अधिक निर्यात वाढावी आदी उद्देश्याने लवकरच राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशिल माने, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, कृषी आयुक्तालयाचे (पुणे) सहसंचालक रविशंकर चलवदे, सहायक संचालक (संशोधन) डॉ. अशोक पिसाळ, रामेतीचे प्राचार्य बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिदंर पागंरे (कोल्हापूर), जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार (सांगली), जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे (सातारा), ऊस तज्ज्ञ संजीव माने आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, कृषी विद्यापीठाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक प्रश्नाचे निराकरण करावे. शेतकऱ्यांनी रासायनिक शेती ऐवजी सेंद्रीय शेती करण्याला प्राधान्य द्यावे तसेच त्यांनी कृषी पुरक व्यवसायाकडे वळावे, भविष्यात शेतकऱ्यांना कृषी विषयक चुकीची औषधे देणाऱ्या कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसुल करुन ती संबंधित बाधित शेतकऱ्यांना देण्याबाबत विचार सुरु असून याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. पर्जन्यमान व हवामान केंद्रे गावोगावी उभे करण्याबाबत शासनाचा विचार सुरु आहे. कृषी विभागात सुटसुटीतपणा आणणार असल्याचे सांगून कृषी विभागाकडून पारदर्शी कामकाजाला प्राधान्य देणार असल्याचेही कृषीमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले.
विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी राज्यात ऊस उत्पादनामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची विशेष योगदान असल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. तसेच ऊस तज्ज्ञ संजीव माने व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विविध कृषी विषयक स्टॉलला भेट देवून तेथील उपस्थितांशी संवाद सांधला. यावेळी कृषी मंत्र्यांनी सांगली जिल्ह्यात दिनांक २३ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित फळ महोत्सवाच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या प्रसिध्दी रथाला हिरवा झेंडा दाखविला. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्षे, भातपीक, नाचणी, डाळिंब, बांबु, हळद, काजु, आंबा, ड्रॅगन, नर्सरी आदी पिकांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींचा उहापोह केला. या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या विविध योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देश्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर विभागातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रथमच परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात प्रत्यक्ष कृषी मंत्र्याशी थेट संवाद झाल्याने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कृषी विभागाला धन्यवाद दिले. या परिसंवादाच्या निमित्ताने तब्बल सुमारे साडेचार तासाहून अधिक वेळ उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. |
*****