महाराष्ट्रातील अनेक कवींनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. ग्रामीण मराठी बोलीभाषेतील कविता अंतर्मनाला स्पर्श करून जातात अशाच काही कविता बहिणाबाई चौधरी यांनी रचल्या आहेत. खानदेशातील एका शेतकरी कुटुंबात बहिणाबाईंचा जन्म झाला, पाटीपुस्तकाचा तर सोडाच, पण अक्षराचाही गंध नसलेल्या बहिणाबाईंचा दिवस, उगवल्यापासून मावळेपर्यंत काळ्याभोर जमिनीच्या सान्निध्यात जात असे, या ‘काळ्या आईच्या कुशीतच त्या वाढल्या, त्यांचे व्यक्तिमत्त्वही त्या काळ्या आईनेच घडविले. तिच्याजवळ त्या आपली सगळी सुखदुःखे बोलत, सरस्वतीचा त्यांच्यावर जणू वरदहस्तच होता, त्यामुळे त्यांचे साधे बोलणेही गाणे होत असे. अशा अनेक गाण्यांच्या रचना त्यांनी केल्या आहेत, बोलीभाषेच्या लडिवाळपणामुळे बहिणाबाईंची गाणी अधिक मधुर वाटतात.
बहिणाबाईच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसारः शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग: अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे या आणि इतर त्यांच्या कवितांचे विषय असत.
बहिणाबाईंच्या रचलेल्या कविता मध्ये जागोजागी जीव, जातींचा उल्लेख आलेला असून या मध्ये, खीरा, भीमफूल, गोंडंबा, सागरगोटे, ढोर, इचू, साप, कपाशी, गाय, बोरी, वाभई, पळस, सुगरण या निसर्ग चित्रणाचा समावेश आहे.
बहिणाबाईंची गाणी ही त्यांच्या संसाराची गाणी आहेत, ही गाणी त्यांच्या पोटातून ओठांवर आली आहेत. निसर्गातील विविधतेचे निरीक्षण व बारकाव्यांचे त्यांनी केलेले वर्णन वाखाणण्यासारखे आहे,
“अरे खोप्यामधी खोपा, सुगरनीचा चांगला देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला;
बहिणाबाईच्या अशाच कविता मराठी मनाला स्पर्शून जातात
महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र बहिणाबाईच्या मृत्यूनंतर बहिणाबाईचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या, अत्रे उद्गारले, “अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे, आणि अत्रे यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहज म्हणून रचलेल्या त्यांच्या बऱ्याच कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच त्यांच्यासोबत गेलेल्या आहेत.
बहिणाबाई यांच्या काव्यरचनांवर आधारित “खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा”सांस्कृतिक कार्यक्रम
. बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित “खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा” हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे निर्माते, संगीत दिग्दर्शक, गायक प्रा.डॉ. अशोक जोंधळे आणि अशाताई जोंधळे आहेत.
राहुल शोभाबाई लक्ष्मणराव भालेराव
जिल्हा माहिती अधिकारी ,
पालघर