साहित्य नगरीतील ग्रंथनगरीत वाचकांची झुंबड

नवी दिल्ली दि. २२ : येथील तालकटोरा स्टेडियममधील  छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होत असलेल्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त  उभारण्यात आलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ग्रंथनगरीतील नामांकित प्रकाशन संस्थांच्या दालनांना साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातील विविध नामांकित प्रकाशनाच्या दालनांना साहित्य रसिक भेट देत आहेत. महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यातून आलेले साहित्यप्रेमी दालनांना भेट दिल्यानंतर पुस्तके चाळताना दिसत आहेत. बार्टी, बालभारती, लोकराज्य यासह शासनाच्या विविध प्रकाशनाच  दालनांवरही साहित्य रसिकांची गर्दी होती. या नगरीत शंभरहून अधिक दालने  आहेत.

 तमाशा आणि वारीचा अनोखा दस्तावेज

 यंदाच्या संमेलनात संदेश भंडारे यांच्या छायाचित्रांनी साकारलेल्या “तमाशा आणि वारी” या विशेष स्टॉलने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेतील दोन महत्त्वाचे सांस्कृतिक प्रवाह – पंढरीची वारी आणि तमाशा यांचे अप्रतिम छायाचित्र संकलन येथे प्रदर्शित करण्यात आले आहे.