नाशिक, दि. २४: आरोग्य विज्ञान क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानामुळे सातत्याने बदल होत आहेत. हे तंत्रज्ञान आत्मसात करीत आणि स्वतःतील संवेदनशीलता कायम ठेवत भावी डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यातील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करण्यात येणार असून या ठिकाणीही किमान महिन्यातून एक दिवस या डॉक्टरांनी सामान्य आणि गरजू रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचा २४ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एन. गंगाधर, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, प्रति कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, कुलसचिव राजेंद्र बंगाळ यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, आरोग्य विज्ञान क्षेत्रात विद्यार्थी जीवनात नाविन्याची ओढ आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. अभ्यासक्रम पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात काम करतांनाही या गोष्टी आवश्यक ठरतात. स्नातकांनी स्वतंत्रपणे वैद्यकीय सेवा सुरू केल्यानंतर रुग्णांना चांगली वागणूक द्यावी. आपल्या प्रत्येक कृतीत आणि उपचारावेळी मानवी संवेदना हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवेचा अधिकाधिक उपयोग झाला पाहिजे. आरोग्य सेवा क्षेत्रात संधी वाढत आहेत. जागतिक पातळीवर संधी उपलब्ध होत आहेत. या संधीचा उपयोग करून घेण्याचे आवाहनही राज्यपालांनी केले. आरोग्य क्षेत्रात काम करताना मानसिक कणखरता महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, रुग्णसेवा ही ईश्र्वरसेवा असल्याचे नेहमीच लक्षात ठेवावे. सेवा करताना नैतिकता ठेवावी. सामान्य रुग्णांना योग्य सेवा द्यावी. राज्यात अजून एमबीबीएससाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने ९०० जास्त जागांना मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील नवनवीन उपक्रमांना राज्य शासनाचे पाठबळ मिळेल, अशी ग्वाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री. गंगाधर म्हणाले , वैद्यकीय क्षेत्र विस्तारले आहे. एकात्मिक आरोग्य शिक्षणाला महत्व येत आहे.पारंपरिक पद्धतीसोबतच नव्या तंत्रज्ञानांचा उपयोग विद्यापीठ करत आहे. विविध संस्था आणि शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करून जे जे नवीन आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न येथे होतो आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे लाभ होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक कणखरता गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकर (निवृत्त) यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी वार्षिक अहवाल सादर केला. विद्यापीठ राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी राज्यपाल तथा कुलपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते १५ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी देऊन गौरविण्यात आले तर विविध विद्याशाखेतील १११ विद्यार्थांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर, अभ्यासक्रमाच्या आणि आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या ८ हजार ५४७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘ब्लू प्रिंट ऑफ नर्सिंग’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. तेथे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे मेजर जनरल असीम कोहली यावेळी उपस्थित होते.