सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी नंबर प्लेट’ लावणे बंधनकारक

राज्यात एचएसआरपी लावण्याचे दर फिटमेंट चार्जेससह

मुंबई, दि. २७ : केंद्रीय मोटार नियम १९८९ च्या नियमानुसार सर्व वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ‘ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक केले आहे.

देशातील बहुतेक राज्यात जुन्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार उच्चाधिकार समितीने ३ कंपन्यांचे दर अंतिम केले असून मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले आहेत.

राज्यात ठरवून दिलेले दर हे ‘एचएसआरपी ‘ नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत. तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती एसआयएएम (SIAM) च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सह परिवहन आयुक्त यांनी कळविले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/