इजिप्तच्या राजदूतांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची घेतली सदिच्छा भेट
मुंबई, दि. २८ : इजिप्त आणि भारत यांच्यात हजारो वर्षांपासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध असून सहकार्याच्या आजच्या नव्या युगात मुंबई आणि अलेक्झांड्रिया शहरांमध्ये भगिनी शहरांप्रमाणे परस्पर सहकार्य प्रस्थापित केले जावे अशी अपेक्षा इजिप्तचे भारतातील नवनियुक्त राजदूत कामिल झाएद गलाल यांनी आज येथे व्यक्त केली.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील घनिष्ठ मैत्रीचा उल्लेख करून, भारतातील आपल्या राजदूत पदाच्या कार्यकाळात दोन्ही नेत्यांनी स्वाक्षरी केलेला भारत-इजिप्त भागीदारी करार प्रत्यक्षात आणण्याचा आपण प्रयत्न करू असे राजदूतांनी सांगितले.
इजिप्तच्या राजदूतांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला इजिप्तच्या मुंबईतील नवनियुक्त कॉन्सुल जनरल दहलीया तवाकोल या देखील उपस्थित होत्या.
भारताप्रती इजिप्तचे हृदय आणि मन सदैव मोकळे असल्याचे सांगताना राजदूत गलाल यांनी सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य मजबूत करण्यासाठी इजिप्तमधील सर्वात मोठे अलेक्झांड्रिया ग्रंथालय आणि एशियाटिक सोसायटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्याबाबत उत्सुकता दाखवली.
आगामी काळात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (एजीआय) आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वाढावे असे सांगताना भारतीय कंपन्यांनी इजिप्तमध्ये कार्यालये आणि गोदामे स्थापन करावी असे त्यांनी सांगितले.
सन २०१४ या वर्षी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष सिसी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांमध्ये परिवर्तनकारी बदल झाले असून आज इजिप्त-भारत संबंध वाढवण्याच्या बाबतीत अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
इजिप्तचे युरोपियन युनियन, अरब राष्ट्रे आणि लॅटिन अमेरिका यातील देशांसह ११० देशांसोबत मुक्त व्यापार करार आहेत. त्यामुळे भारत आणि इजिप्तमधील व्यापार संबंधांमुळे भारतीय व्यवसायांसाठी जागतिक बाजारपेठ खुली होईल असे त्यांनी सांगितले.
राजदूतांचे महाराष्ट्रात स्वागत करताना, राज्यपालांनी इजिप्त आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक बंधाची आठवण करून दिली. देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी अलिप्त राष्ट्र चळवळ उभारली होती याचे राजदूतांनी स्मरण केले. आगामी काळात नवी मुंबई विमानतळ आणि मुंबईजवळील वाढवण बंदराच्या कार्यान्वयनानंतर भारत-इजिप्त व्यापाराला मोठी चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.
0000