‘साहित्य अकादमीचा साहित्योत्सव’ होणार दिमाखदार; ७ ते १२ मार्च  दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन

नवी दिल्ली दि. 5:  साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा सोहळा मानला जाणारा साहित्य अकादमी साहित्योत्सव 2025 हा दि. 7 ते 12 मार्च या कालावधीत नवी दिल्लीतील रवींद्र भवन येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य अकादमीचे सचिव श्रीनिवासराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या साहित्योत्सवात 24 भारतीय भाषांतील 700 हून अधिक नामवंत साहित्यिक, लेखक, कवी आणि विचारवंत सहभागी होणार आहेत.

या साहित्योत्सवात साहित्य अकादमी पुरस्कार वितरण समारंभ, काव्यवाचन, परिसंवाद, चर्चासत्रे आणि पुस्तक प्रकाशनासारखे 150 पेक्षा अधिक कार्यक्रम होणार आहेत. यंदाच्या सोहळ्यात भारतीय भाषांमधील साहित्याचा जागतिक संदर्भ, समकालीन साहित्यिक प्रवृत्ती, नव्या लेखकांसाठी संधी आणि डिजिटल युगातील साहित्याचा प्रभाव यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

 

साहित्य अकादमी पुरस्कार वितरण समारंभ 8 मार्च रोजी

 

या साहित्योत्सवातील विशेष आकर्षण असलेला साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळा दि. 8 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता कमानी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध भाषांतील साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय साहित्याची समृद्ध परंपरा साजरी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला साहित्योत्सव 2025 हा साहित्यप्रेमींसाठी एक वैचारिक आनंद सोहळा ठरणार आहे. साहित्य रसिकांनी या भव्य सोहळ्यात सहभागी होऊन भारतीय साहित्याच्या विविधतेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन साहित्य अकादमीच्यावतीने करण्यात आले आहे.

0000