विद्यापीठांचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी समिती नियुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
मुंबई, दि. ६ : राज्यातील विविध विद्यापीठांकडून उपकेंद्र स्थापन करण्याविषयी प्रस्ताव येत आहेत. या उपकेंद्र स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य विक्रम काळे, भावना गवळी यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सर्वच ठिकाणी उपकेंद्र स्थापन करण्यासाठी मागणी होत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्ये पुढाकार घेवून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्या ठिकाणी उपकेंद्र स्थापन करायचे याचा निर्णय घ्यावा. एक जिल्हा एक विद्यापीठ या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. पूर्वी प्रमाणे आता प्रत्यक्ष जाऊन विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजाची गरज राहिली नसून बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे उपकेंद्राच्या ठिकाणी आता प्रशासकीय कामासोबतच आणखी काही कार्यक्रम राबविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
0000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
शाळांच्या सुस्थितीसाठी रोडमॅप तयार करणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई दि. 6 :- शालेय शिक्षण हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शासनाच्या शाळा सुस्थितीत राहाव्यात यासाठी विविध मार्गांनी निधी उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात येत असून शाळा सुस्थितीत राहाव्यात यासाठी रोडमॅप तयार करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील शाळांच्या स्थितीबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.
शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, राज्यात 24 हजार 152 अनुदानित खासगी व्यवस्थापनाच्या शाळा असून यापैकी अनेक शाळा सुस्थितीत आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व शैक्षणिक तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे ही शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी असून त्याचा आढावा घेण्यात येईल. पवित्र प्रणालीमार्फत भरती प्रक्रिया सतत सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) चा निधी लवकर देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
0000
ब्रिजकिशोर झंवर/विसंअ/
शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाईन करणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ६ : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते देण्याबाबत शासन निर्णय १२ जून २००९ आणि १७ फेब्रुवारी २०२१ अन्वये आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. अमरावती विभागातील उशिराने एनपीएस क्रमांक घेतलेल्या एकूण १०८ कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याची कार्यवाही सुरू असून ही कार्यवाही ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येईल. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य अडचणी सोडविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत आसगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, सुधाकर आडबाले यांनी सहभाग घेतला.
या प्रश्नाबाबत उत्तर देताना मंत्री श्री. भुसे म्हणाले, शिक्षकांचे प्रलंबित हप्ते देण्यासाठी एनपीएस अथवा डीसीपीएस चे खाते निवडणे आणि त्याचा क्रमांक प्राप्त करुन घेणे अनिवार्य आहे. शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विविध कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून नजिकच्या काळात विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/
समग्र शिक्षा अभियानामधील करार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही -शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई दि. ६ : समग्र शिक्षा अभियानातील ३७८४ कर्मचाऱ्यांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यात प्राप्त होईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करणार का, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.
या प्रश्नाच्या अनुषंगाने अधिक माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री भुसे म्हणाले, समग्र शिक्षा अभियानात एकूण १६ हजार १०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८२६९ कर्मचारी कार्यरत आहेत. २९८४ कर्मचाऱ्यांची समायोजन तपासणी प्रक्रिया प्रगतीपथावर असून ३७८४ कर्मचाऱ्यांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे.
शासन सेवेत कायम करण्यासाठी उपोषणास बसलेल्या इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी, अशी सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी केली, त्यास अनुसरून त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही चुकीची भरती नाही – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ६ : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही चुकीची भरती झाली नसल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिले. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्तेवर अधारित शिक्षकांची भरती होत असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले की, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची नेमणूक करताना त्यांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजेच डीएड, बीएड हे त्याच भाषेत झाले असल्यासच नियुक्ती देण्यात येते. तसेच पवित्र पोर्टल टप्पा दोनमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी चांगला संवाद निर्माण व्हावा यासाठी त्याच माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात येत आहे. यामुळे सर्वच विषयांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन दर्जेदार शिक्षण देता येईल. यासाठी उमेदवाराचे इ.10 वीचे माध्यम विचारात घेतले जाणार आहे.
उर्दू आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये त्या भाषेत शिक्षण न घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक झालेली नाही. तर त्या – त्या विषयामध्ये व्यवसायिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीच नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांशी आणखी चांगल्या प्रकारे संवाद साधता यावा यासाठी पवित्र पोर्टल दोनमध्ये उमेदवार नियुक्तीच्या तरतूदी करण्यात येत असल्याचेही श्री. भुसे यांनी सांगितले.
0000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
यवतमाळच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी प्रकरणी स्थापन समितीच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई -शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ६ : यवतमाळ जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांची चौकशी करण्यासाठी सहयक शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल दिला आहे. या अहवालानुसार जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिले.
सदस्य सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी सदस्य अभिजीत वंजारी, राजेश राठोड यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
यवतमाळचे शिक्षणाधिकारी त्यांचे काम योग्य पद्धतीन करत नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिल्याचे सांगून मंत्री शालेय श्री. भुसे म्हणाले की, या प्रकरणी चौकशीसाठी प्रथम सहायक शिक्षण आयुक्त यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात त्रुटी असल्याने पुन्हा नव्याने एक समिती नेमण्यात आली. त्यासमितीने आपला अहवाल कालच सादर केला आहे. या अहवालामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे श्री. भुसे यांनी सांगितले.
0000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/