मुंबई, दि. 8:- भक्ती व शक्तीच्या मिलापातून सश्रद्ध, समतायुक्त समाज निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करून भक्ती शक्ती व्यासपीठाला राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने श्री गुरु पादुका दर्शनासाठी एनएससीआय डोम,वरळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सकाळ माध्यम समूहाचे अभिजीत पवार, जीवन मिशनचे प्रल्हाददादा पै उपस्थित होते.
भक्ती शक्ती व्यासपीठाने आयोजित केलेल्या या उपक्रमात सूक्ष्म रूपाने पादुकांच्या रुपात उपस्थित असलेल्या गुरु शक्तीला वंदन करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या उपक्रमातून सकारात्मक ऊर्जा, भक्ती आणि अध्यात्माचा संदेश आपल्या जीवनात घेऊन जाण्याचा प्रत्येकजण संकल्प करूया.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम साधणारा हा पादुका महोत्सव आहे. या महोत्सवात 21 पवित्र पादुकांचे आगमन झाले आहे. या पादुका त्या महान गुरुजनांच्या होत्या, ज्यांनी समाजाला दिशा, विचार आणि जीवनमूल्य दिली. हा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असून प्रत्येकाने समाजाच्या कल्याणासाठी आपापल्या परीने योगदान द्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
पादुकांचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रभू श्रीराम आणि भरत यांचे उदाहरण दिले. पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर जणू काही गुरुमहाराजांचेच दर्शन आपल्याला झाले आहे अशा प्रकारची अनुभूती आपल्याला येत असते आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये पादुकांचे महत्त्व मोठं असल्याचे ते म्हणाले.
भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल सकाळ समूहाचे अभिजीत पवार यांचे मुख्यमंत्री महोदयांनी अभिनंदन केले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अभिजीत पवार व जीवन मिशनचे प्रल्हाददादा पै यांनी मनोगत व्यक्त केले.
तद्नंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी भक्ती शक्ती महोत्सवात आलेल्या 21 पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.