नागपूर, दि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांना दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत जनतेच्या तक्रारी ऐकूण घेण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागामध्ये आठवड्यातून दोन दिवस निश्चित करावे. तसेच कार्यालयांमध्ये स्वच्छता, अभ्यागतांना बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, उन्हाळ्याच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विभागीय लोकशाही दिनासाठी आलेल्या विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज दिले.
सर्व सामान्य जनतेला आपल्या प्रश्नांसंदर्भात व समस्यांबाबत समाधान करून घेण्याकरिता विविध शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागते. जनतेचे म्हणने ऐकूण घेण्याकरिता व त्यांचे समाधान करण्याकरिता संबंधित शासकीय कार्यालयाच्या प्रमुखाने आठवड्यातून दोन दिवस निश्चित करून भेटावे. संबंधित अधिकारी कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू न शकल्यास त्यांच्या ऐवजी अन्य अधिकाऱ्यांनी जनतेला भेटावे. भेटीच्या वेळांसंदर्भात कार्यालया बाहेर ठळक अक्षरात व दर्शनी भागात फलक लावावे, अशा सुचनाही श्रीमती बिदरी यांनी केल्या. यामुळे थेट मंत्री व मंत्रालयात जनतेला आपल्या समस्या घेवून जाव्या लागणार नाहीत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रितसर मार्गदर्शन होवून त्यांचे समाधान होईल असेही त्या म्हणाल्या.
नागपूर सूधार प्रन्यास, विशेष पोलीस महानिरीक्षक, महा नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालविकास, कृषी, परिवहन आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
0000