समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य हीच अर्थपूर्ण जीवनाची दिशा ! – न्यायमूर्ती अनिल किलोर 

विधि सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न; प्राधिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभाचे वितरण 

बुलढाणा,दि. 23 : ‘समाजाला काही देणं लागतं’ या दृष्टीकोनातून शेवटच्या घटकाला नजरेत ठेवून त्यांच्या फायद्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहावा. यातूनच जगण्याला अर्थ मिळेल आणि आयुष्य जगण्याची दिशा, ध्येय प्राप्त होईल, असे प्रतिपादन नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.

शहरातील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित विधि सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी न्यायमूर्ती अनिल किलोर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष मंजुषा देशपांडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे, विधिज्ञ, विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

न्यायमूर्ती अनिल किलोर पुढे म्हणाले की, अनेक लोकांना कायद्याची पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्यांना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव होत नाही. संविधानाने दिलेले अधिकार माहिती नसल्यामुळे अनेकजण न्यायालयापर्यंत जात नाहीत. अशावेळेला लोकांना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. काही चुकीचे होत असेल तर त्या संबंधात न्यायालयात दाद मागायला पाहिजेत. समाजात वावरतांना लोकांना आपले अधिकार माहित व्हावेत यादृष्टीने उच्च न्यायालयाच्या नागपूर बार असोसिएशनचा अध्यक्ष असतांना ‘न्याय दूत’ हा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून गावांना भेटी देवून लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, असेही न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी आवर्जून सांगितले.

शासकीय योजनांची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आजच्या स्मार्टफोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना शासकीय योजनांचा फायदा कसा करुन घेता येईल यासाठी प्रयत्न करावे. यातूनच शासनाच्या कार्यक्रमांना अर्थ प्राप्त होईल. शासकीय योजनांच्या महामेळाव्यासारख्या कार्यक्रमातून लोकांना फायदा व्हायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त असे उपक्रम राबवले पाहिजेत, अशी अपेक्षाही न्यायमूर्ती श्री किलोर यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचेसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.

सहज प्रणाली ॲपचे लोकार्पण

महसूल विभागाने डिजिटाईज्ड केलेले दस्तावेज नागरिकांना सहजरित्या प्राप्त व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘सहज प्रणाली’ॲप विकसित केले आहे. या ॲपले आज न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या अॅपचा लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

५० हून अधिक विभागांचे माहिती स्टॅाल्स

विधि सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यात विविध विभागांच्या योजनांची माहिती लोकांना होण्यासाठी विविध विभागाचे ५० हून अधिक स्टॅाल्स उभारण्यात आले होते. या स्टॅाल्सना लोकांनी भेटी देवून योजनांची माहिती जाणून घेतली.

यावेळी न्यायमूर्ती श्री. किलोर यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.

००००