मुंबई दि. २६ : उत्तराखंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. खेळाडूंची ही उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद व सुवर्णक्षण असल्याचे गौरवउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या पथकातील खेळाडूनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष तसेच महिला संघाने अजिंक्य पद पटकावल्याबद्दल आणि तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने जेतेपद पटकावल्याबद्दल अभिनंदनचा प्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंचे, तसेच भारतीय खो-खो संघ आणि भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन केले. तसेच, रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या विदर्भ संघालाही शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत प्रथम क्रमांक
मुख्यमंत्री फडणवीस अभिनंदनपर भाषणात म्हणाले, या स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण २०१ पदके मिळवली, त्यात ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या ५८० खेळाडूंनी ३२ क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला, त्यापैकी २६ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राने पदकांची कमाई केली. ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १२ सुवर्ण पदके पटकावली. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे राज्यभरातून कौतुक होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुरुष, महिला खो-खो संघाची देदिप्यमान कामगिरी
भारतीय पुरुष आणि महिला खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दोन्ही भारतीय संघ अपराजित राहिले. या स्पर्धेत दोन्ही संघाने देदिप्यमान कामगिरी करत दमदार विजयासह इतिहास रचला.
महिला कबड्डी संघाचा अभिमान
भारतीय महिला कबड्डी संघाने सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. क्रिकेटव्यतिरिक्तही भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत, याचा अभिमान संपूर्ण देशाला वाटते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आपल्या अभिनंदनपर भाषणात म्हणाले.
विदर्भ क्रिकेट संघाचे अभिनंदन
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सर्वात प्रतिष्ठेची रणजी ट्रॉफी यंदा विदर्भ संघाने जिंकली आहे. देशभरातील विविध राज्यांच्या संघांमध्ये चुरशीच्या सामन्यांनंतर विदर्भाने अंतिम विजय मिळवला याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विदर्भ क्रिकेट संघातील खेळाडू प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/