सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

महिलांच्या स्वयंसिद्धतेसाठी व्रतस्थ समाजसेविका हरपली

मुंबई, दि. २६: महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धा उपक्रमाद्वारे सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील अशी व्रतस्थ समाजसेविका हरपली, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ‘स्वयंसिद्धा’च्या संस्थापक संचालिका कांचनताई परुळेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात “कांचनताईंनी ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महिलांना त्यांनी स्वयंसिद्धा च्या माध्यमातून विविध शिक्षण – प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. यातून अनेक महिलांना उद्योजकतेची प्रेरणा मिळाली. यातून अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले. कांचनताईंच्या निधनाने महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

000