छत्रपती संभाजीनगर, दि.२८ (जिमाका) – जनसामा
येथील विमानतळाच्या प्रांगणात ‘भिमता’ (Buddhist Indusatrial Maufacturers And Traders Association) या संस्थेच्या वतीने साकारण्यात आलेल्या बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्यासाठी श्री.सामंत आले होते. पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, भिमता चे अध्यक्ष मिलिंद थोरात आदी यावेळी उपस्थित होते.
प्रशिक्षण केंद्राला जागा देणार
श्री.सामंत म्हणाले की, जगाला अहिंसेचा संदेश भगवान बुद्धांनी दिला. जनतेचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी खडतर तप केले. अशा या बुद्धा पुढे नतमस्तक होऊन सगळ्यांनी शासनाने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जे जनकल्याणाचे कार्य आरंभले आहे त्यात आपला सहयोग द्यावा. लोकांना त्रास देऊन, बदनामी करुन काहीही साध्य होत नाही. जातीवर नव्हे कर्तृत्वावर श्रेष्ठत्व ठरत असतं. शासन अशा सर्व समाज घटकांसोबत आहे. उपेक्षितांच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले. ‘भिमता’, संस्थेला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा देण्यासंदर्भात लवकरच मान्यता प्रदान करु, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच ‘भिमता’ या संस्थेने बुद्ध मूर्ती स्थापनेसाठी केलेले प्रयत्न व संस्थेचे उद्योग क्षेत्रातील कार्य याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गारही काढले.
भगवान बुद्धांचे विचार अंमलात आणा- इमाव कल्याण मंत्री सावे
श्री.सावे म्हणाले की, भगवान बुद्धांचे शांतीचे विचार प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणारा प्रत्येक प्रवासी शहरात येतांना या बुद्धमुर्तीकडे पाहून शांतीचे विचार घेऊन येईल. भगवान बुद्धांच्या कार्याची माहितीही याठिकाणी प्रदर्शित करावी,अशी सूचना त्यांनी केली.
विकासासाठी शांतता आवश्यक – पालकमंत्री शिरसाट
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की. बुद्ध मुर्तीचे अनावरण झाले, ही आनंदाची बाब आहे. बुद्धांची शांती आणि करुणेच्या विचारांची प्रेरणा आपण साऱ्यांनी घ्यायला हवी. येथे येतांना या मुर्तीला वंदन करुन शांततेचा भाव मनात जागृत करुनच लोक शहरात येतील. अशी शांतता प्रस्थापित करणे हे विकासासाठी अत्यंत आवश्यक असते, असे प्रतिपादनही पालकमंत्री शिरसाट यांनी केले.
भदंत बोधीपालो महाथेरो व भिक्खु संघाच्या वतीने प्रतिष्ठापना, पूजन आणि धम्मदेसना करण्यात आली. बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरस अँड ट्रेडर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद थोरात, सुभाष मुदगावकर, प्रवीण कुमार वसाते, सिद्धार्थ जाधव, बाळासाहेब पठारे, सूर्यकांत कोटकर, रामचंद्र पठारे, सुभाष मोरे विनोद अवसरमल, प्रमोद राऊत, संदीप केदारे आदी यावेळी उपस्थित होते. मिलिंद बागुल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अशी आहे बुद्धमूर्ती!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा-वेरूळ लेण्यांमधून बौद्ध संस्कृतीचे दर्शन होते. जगभरातून येथे येणाऱ्या पर्यटकांना शहराच्या ऐतिहासिक वारशाची जाणीव व्हावी, यासाठी विमानतळावर भव्य बुद्धमुर्ती उभारण्याची कल्पना पुढे आली. ‘भिमता’ संघटनेच्या सदस्यांनी हा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाकडे सादर केला. ११ जानेवारी २०२३ रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. तेलंगणातील आलागट्टा येथे १५.५ फूट उंच आणि अखंड बेंगलोरी ग्रॅनाइटमध्ये अभयमुद्रा असलेली बुद्धमूर्ती तयार करण्यात आली. ही बुद्धमूर्ती ५ मे २०२३ रोजी बौद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्थानापन्न करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण करून आज लोकार्पण करण्यात आले.