नाशिक, दि. 28 मार्च, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : मागील कुंभमेळ्याच्या धर्तीवर 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असून ही एक सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्यातून यशस्विपणे पार पाडू, असे प्रतिपादन जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण, पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, उपजिल्हाधिकारी (कुंभमेळा) रवींद्र भारदे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज, महंत रामनारायणदास महाराज, कपिलधारा कावनई, महंत कृष्णचरदास महाराज, महंत राजारामदास महाराज, महंत भगवानदास महाराज, महंत नरसिंगाचार्य महाराज, महंत बालकदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री.महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची व सहकार्याची आवश्यकता आहे. प्रयागराज येथे झालेला कुंभमेळ्यातील भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर येथेही मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत 3 ते 4 पट अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यावेळी पावसाळ्याचा कालावधी असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षितेचे अधिक काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. कुंभ पर्वणी काळात महंत व भाविकांच्या स्नासासाठी नदीपात्रातील पाणी स्वच्छ व वाहते ठेवण्याच्या दृष्टीने पर्यायी पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळासाठी योग्य नियोजन व सुविधांसाठी आवश्यक जमिनी कायमस्वरूपी संपादित केल्या जातील. साधू-महंत यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असेही जलसंपदा मंत्री श्री.महाजन यांनी सांगितले.
यावेळी महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, रामसनेहीदास महाराज, राघवदास महाराज, सतीश शुक्ल यांच्यासह महंतांनी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने विविध सूचना मांडल्या.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीसाठी आलेल्या सर्व महंतांचे स्वागत केले.