लातूर जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करावे – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 2 : लातूर येथे भव्य विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठीची कार्यवाही जलद गतीने करावी. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडापट्टूंसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही टप्प्या-टप्प्याने विकास करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

जिल्हा क्रीडा संकुलाचा पुनर्विकास व लातूर येथील विभागीय क्रीडा संकुल उभारणीस गती देणेबाबत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार अमित देशमुख, क्रीडा व युवक कल्याणचे सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उप जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता टकले आदिसह अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण व नवीन क्रीडा सुविधा निर्माण  करण्याकरिता प्रत्यक्ष जागेची पाहणी करून, मुलभूत सेवांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच प्रेक्षा गॅलरीची उभारणी आणि जुन्या प्रेक्षा गॅलरीस शेड उभारण्यात यावी. यासाठी अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही त्वरीत करावी.

याचबरोबर नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी विभागीय क्रीडा संकुल लातूर येथे उभारण्यात येणार आहे. तसेच इतर विभागीय क्रीडा संकुलासाठी उपलब्ध सोयी-सुविधांचा अभ्यास करून त्याच धर्तीवर विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भातील कार्यवाही करण्याच्या निर्देशमंत्री भरणे यांनी दिले.

आमदार अमित देशमुख यांनी क्रिकेट प्रबोधिनी उभारणे, क्रीडा संकुलाचा रस्ता, अल्पसंख्यांक वर्गातील मुलांचे वसतीगृह यासंदर्भात सूचना केल्या. यासंदर्भात क्रीडा मंत्री भरणे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/