झोपडपट्टीधारक, रस्ता रुंदीकरण बाधितांच्या तक्रारींवर कार्यवाही करावी; पाणीटंचाईची समस्या दूर करा – वनमंत्री गणेश नाईक यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, दि. 11 (जिमाका): वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्यांवर आधारित 345 हून अधिक निवेदने सादर केली.
वनमंत्री नाईक यांनी शक्य असलेल्या निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अथवा प्रत्यक्ष सूचना देऊन दिले. उर्वरित निवेदनांवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही केली जाईल आणि त्याबाबत पुढील जनता दरबारात अर्जदारांना माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या जनता दरबाराला माजी खासदार डॉ. संजीव नाईक, संजय वाघुले, आमदार निरंजन डावखरे, मनोहर डुंबरे, नारायण पवार यांच्यासह विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आजच्या जनता दरबारात नागरिकांनी विशेषतः पाणीटंचाई, रस्ता रुंदीकरणामुळे झालेले अन्याय आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील गैरव्यवहार यांसारख्या समस्यांवर भर दिला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मूळ झोपडीधारकांच्या नावाऐवजी इतरांची नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारी झोपडीधारकांनी मांडल्या.
रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या अनेक नागरिकांना अद्याप घरे व दुकाने न मिळाल्याने त्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. विविध भागांतील पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांनी सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निवेदने सादर केली. या पार्श्वभूमीवर, वनमंत्री नाईक यांनी रस्ता रुंदीकरण बाधितांना लवकरात लवकर न्याय देण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी बळकावल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. ज्या प्रवृत्तींनी सर्वसामान्यांच्या जीवनात दुःख निर्माण केले आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी, असा स्पष्ट सल्लाही ना. नाईक यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “लोकांच्या समस्या अनेकदा स्थानिक पातळीवर सुटत नाहीत. अशा वेळी त्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांची निराशा दूर व्हावी, हाच जनता दरबार घेण्यामागचा उद्देश आहे. येथे आलेल्या प्रत्येक प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी आमचे निश्चित प्रयत्न राहतील. आतापर्यंत झालेल्या जनता दरबारातील तक्रारींपैकी जवळपास 60 टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आम्हाला यश आले आहे. नागरिक आनंदाने पुष्पगुच्छ किंवा शाल घेऊन येतात, पण मी इथे केवळ लोकसेवेच्या भावनेतून आलो आहे.”
ते पुढे म्हणाले, “निश्चितच, लोकांना दिलासा देण्यासाठी जनता दरबार हे एक उत्तम माध्यम आहे. महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि कंत्राटी सेवांसारखी अनेक आव्हाने आहेत. घनकचरा व्यवस्थापनात आयुक्तांना काही अडचण असल्यास निश्चितपणे मदत केली जाईल, कारण ठाणेकर जनता आपलीच आहे. एकेकाळी मी 15 वर्षे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि आता संपर्कमंत्री म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणतीही जनता असो, ती आपलीच आहे. जनतेच्या समस्या व व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
कांदळवनाबाबत बोलताना वनमंत्री नाईक म्हणाले, “सागरी किनाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने कांदळवन तोडण्याचे प्रमाण वाढले आहे. जर कोणी कांदळवनात अतिक्रमण केले, तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास अनधिकृत बांधकामे पाडली जातील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही बख्शले जाणार नाही. गरीब नागरिकांनी बांधलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी केले जाईल. उदाहरणार्थ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 1.5 लाखांची वस्ती आहे, ज्यात मूळच्या 42 आदिवासी वाड्या-पाड्यांमधील लोक राहतात. त्यांचे पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर उत्तन आणि ठाणे येथे केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन होईल, असे कोणतेही काम केले जाणार नाही. सध्या वर्सोवा ते नालासोपारा येथे पूल आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत.”
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम तयार केला आहे, असे सांगून ना. नाईक म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, जसे की जल जीवन मिशन, शुद्ध पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन या सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच देशाची प्रगती होत आहे. जनसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. विशेषतः वनविभागाच्या अनेक अडचणी होत्या, परंतु दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत वनविभागाच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी घोषणा केली आहे.”
जनता दरबार कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी कोर्ट नाका येथील महात्मा ज्योतिबा फुले विचार कट्टा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.