मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची घटनास्थळी भेट देऊन पाहणी
नागपूर,दि. १२ : उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी भिषण स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची तर जखमी झालेल्या कामगारास ३० लाख रुपयांची मदत केली जात असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या दुर्देवी अपघातात मृत व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारासोबत शासन खंबीरपणाने उभे आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत असून जे जखमी आहेत त्यांच्यावर शासनातर्फे मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
उमरेड येथील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भिषण स्फोट होऊन तीन कामगार जागीच मृत्यू पावले. तर आठ कामगार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. यातील २ कामगारांचा उपचार सुरु असतांना मृत्यु झाला.
घटनेची माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश देवून जखमींवर उपचारांबाबत व आवश्यक ती मदत देण्यास सांगितले होते.
आज दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने उमरेड येथील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. कामगारांच्या जिवावर बेतणारे अपघात यापुढे होऊ नये यासाठी औद्योगिक सुरक्षिततेच्यादृष्टीने जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. घटनास्थळाची पाहणी करताना त्यांच्या समवेत खासदार श्याम बर्वे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, राजेंद्र मुळक, कंपनीचे प्रमुख अरुण भंडारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अपघातात मृत कामगारांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे ५५ लाख तर शासनातर्फे ५ लाख अशी आर्थिक मदत दिली जाईल. याचबरोबर जखमी कामगारांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये आर्थिक मदत व शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येत आहेत. याच बरोबर मृत्यू व जखमी झालेल्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी दिली जाणार आहे.
अपघातात मृत पावलेले कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पियुष दुर्गे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, सचिन पुरुषोत्तम मसराम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, निखिल शेंडे – रा. विरखंडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, अभिलाष जंजाळ – रा.गावसूत, ता.उमरेड, व निखिल नेहारे – रा. चिखलढोकडा, ता. उमरेड, जि.नागपूर
अपघातात जखमीमध्ये मनीष वाघ – रा.पेंढराबोडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, करण शेंडे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, नवनीत कुमरे – रा.मांगली, ता.उमरेड, जि.नागपूर, पियुष टेकाम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, करण बावणे – रा.पिंपळा, ता.उमरेड, जि.नागपूर, कमलेश ठाकरे – रा.गोंडबोरी, ता.भिवापूर, जि.नागपूर.
******