ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात अखंड वीजपुरवठ्यासाठीचे अडथळे दूर करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. १६ : राज्यातील ग्रामीण भागात उद्योग व व्यवसायांना अखंड वीज मिळण्यासाठी अडथळे निर्माण होणार नाहीत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करावे, असे निर्देश उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीच्या मुख्य कार्यालयात विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊर्जा विभागाशी संबंधित समस्यांविषयी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे, लघु उद्योग भारती, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत या प्रमुख सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व प्रतिनिधींच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. जे तातडीने सोडवता येतील असे प्रश्न तत्काळ मार्गी लावा. नियमित देखभाल आणि दुरुस्तीची कामे वेळेवर पार पाडावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

००००००

राजू धोत्रे/विसंअ