कोल्हापूर दि : 18 (जिमाका ) राज्य शासन धर्मदाय रुग्णालयांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करते. या धर्मदाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार व सौजन्यपूर्वक सेवा प्रदान करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
उद्यम नगरातील पंत वालावलकर रुग्णालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी हेल्थ फाऊंडेशनचे संतोष कुलकर्णी होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, धर्मदाय रुग्णालयांनी प्रथमतः रुग्णावरील उपचाराला प्राधान्य द्यावे तसेच आर्थिक कारणावरून रुग्णांची अडवणूक होता कामा नये. रुग्ण, हा डॉक्टरांमध्ये ईश्वराचा अंश पाहतो त्यामुळे डॉक्टरांनीही आपल्यावरील जबाबदारी ओळखावी. धर्मदाय रुग्णालयांनी आपला नावलौकिक कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन करून हे रुग्णालय जिल्हयातील रुग्णांच्या वैद्यकीय गरजा नक्कीच पूर्ण करेल, असा आशावादही व्यक्त केला.
महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी म्हणाले, या रुग्णालयाबाबत ॲडमीट रुग्णाची एक ही तक्रार येणार नाही. लोकांना अभिमान वाटेल अशी सेवा या रुग्णालयामार्फत दिली जाईल याची शाश्वती देतो असे सांगितले. यावेळी जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले. महात्मा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेच्या रूपाने सर्व प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना याचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमध्ये अस्थिरोग, पॉली – ट्रामा, जनरल सर्जरी, कान – नाक – घसा तसेच मुत्ररोग यांचा समावेश असून लवकरच या रुग्णालयात इतर आजारांच्या उपचारांच्या सोयीचाही समावेश होणार आहे .या रुग्णालयात नेत्र, दंत – चिकित्सा डिजिटल एक्स- रे, सोनोग्राफी, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया त्याचबरोबर सुसज्ज असा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे तसेच हे रुग्णालय राज्य कामगार विमा आरोग्य योजनेशी ही संलग्न आहे.यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख, डॉ.आर.एन गुणे, विरेंद्र वनकुद्रे यांच्यासह महात्मा फुले व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारे सहकारी त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.