वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करावा – वनमंत्री गणेश नाईक

सातारा दि. 18: जंगलातील वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा सभागृहात वनविभागातील योजनांचा व उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री श्री. नाईक अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक पंकज गर्ग, सातारच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, कोयना वन्यजीव प्रकल्पचे उपसंचालक किरण जगताप, सामाजिक वनीकरण सातारचे विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, वन विकास महामंडळ पुणे येथील विभागीय वन अधिकारी सारिका जगताप, चांदोली वनजीव विभागाच्या उपसंचालक स्नेहलता पाटील आदी वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वन विभागातील सर्व रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तणाव मुक्त, आनंददायी वातावरणात काम करून वन विभागाचे बळकटीकरण करावे. वन विभागाच्या ज्या जमिनीवर झाडे उगवत नाहीत अशा जागांवर सोलर पार्क उभे करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. प्रत्येक वन परिक्षेत्रात सुरंगी, बकुळी, बेल, मोह, भाडोळी जांभूळ या रोपांची लागवड करण्यावर प्राधान्य द्यावे. याचबरोबर सीजनल फळे व रीजनल फळांच्या रोपांच्या लागवडीवर भर देण्यात यावा. वन विभागाच्या जुन्या व नादुरुस्त वाहनांची यादी करावी. अशा वाहनांचे विहित पद्धतीने निर्लेखन करावे. जंगलात फिरतीवर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मजबूत बनावटीची वाहने खरेदी केली जातील.