अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोरपणे कारवाई करावी. अवैध शस्त्रे आणि गुटखा विक्रीलाही पायाबंद घालण्यासाठी मोहीमस्तरावर कारवाई करावी. काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करावी. लहान अक्षरातील नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवरदेखील दंडात्मक कारवाई करावी. जिल्ह्यात कोणताही अवैध व्यवसाय सुरु राहणार नाही याची दक्षता घ्यावी, शासनाचे पोलीस दलाला या कारवाईत पूर्णपणे सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण राखण्यासाठी अशी कारवाई गरजेची असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.