मुंबई, दि. २३ :- पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता धरणे व तलावामधील उपलब्ध जलसाठे वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे. टंचाई संदर्भातील परिस्थितीचा अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
उन्हाळी हंगामाच्या अनुषंगाने पाण्याच्या नियोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, संभाव्य टंचाई काळात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवणाऱ्या गावांचा अधिकाऱ्यांनी सर्व्हे करावा. पाण्याची गळती कमी करण्यासाठी उपाययोजना आखून त्यानुसार कार्यवाही करावी. पिण्याचे पाणी उचलणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना मंजूर पाणी, प्रत्यक्ष उचलेले पाणी याबाबत अवगत करावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेण्यात यावी. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी पाणी जपून वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, धरणातील बॅक वॉटरचा सर्व्हे करावा. हा सर्व्हे अचूक होण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. कालवा सल्लागार समितीने ठरविल्याप्रमाणे उन्हाळी हंगामात पाणी सोडण्याचे नियोजन करावे. साठवण तलाव व कॅनॉलच्या सभोवताली असणारी अतिक्रमणे काढावीत. पाणी वापराबाबतचे १५ जुलै पर्यंतचे नियोजन केले आहे त्यानुसार कार्यवाही करावी.
या बैठकीत गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा, पुढील काळात पिण्यासाठी, सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी याचा प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला. प्रकल्पनिहाय उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ