मुंबई, दि.24 :- प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून सेवा करण्याची संधी असते. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबदल जिल्हा प्रशासन संवेदनशील असून या संस्थेस आवश्यक ते सहकार्य करण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनाच्या हीरक महोत्सवानिमित्त चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या उमरखाडी येथील निरीक्षणगृह/बालगृह येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बालगृहातील मुलांसमवेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी श्रीमती गोयल पुढे म्हणाल्या की, ‘पंडित दीनदयाळ यांच्या एकात्म मानव दर्शनाचे महत्त्व तसेच मानवाकडून जीवनात झालेल्या चुका दुरुस्त करण्याच्या संधीचे महत्त्व सांगून त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यावरील अनुभवाचे कथन केले.
यावेळी या सोसायटीकडून करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व बालनिरीक्षणगृहातील मुलांकडून करण्यात येत असलेल्या कौशल्याभिमूख कामकाजाची माहिती घेऊन परिसराची पाहणी केली.
या प्रसंगी मुंबई शहर उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश सांगळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, डोंगरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ठाकूर, तसेच संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, जिल्हा महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
00000
काशीबाई थोरात/विसंअ