पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी – मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.28 : संवाद, व्यापार, आणि संस्कृतीची देवाणघेवाण यासाठी किनारपट्टी भाग नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. भारत, मध्यपूर्व आणि युरोप या देशांना एकमेकांशी अधिक जवळ आणण्याची ही परंपरा सुरू ठेवण्याची गरज आहे. मध्यपूर्व देशांनी अलिकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात जे सकारात्मक बदल घडवले आहेत, ते अत्यंत उल्लेखनीय आहेत. मध्यपूर्व देशांनी पर्यटन विकास करताना जी दूरदृष्टी दाखवली आहे ती कौतुकास्पद असल्याचे मत मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

हॉटेल फोर सीजन येथे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये मंत्री श्री. राणे यांची मुलाखत राजकीय व्यवहार आणि विशेष प्रकल्पाचे प्रमुख आणि मुंबई येथील इस्रायल वाणिज्य दूधवास अनय जोगळेकर यांनी घेतली.

मंत्री श्री. राणे म्हणाले,  पर्यटनातील संधी ओळखून योग्य दिशेने पावले उचलणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील लोक समुद्रकिनाऱ्यांवर वस्ती करत आले आहेत. राज्यात 720 किमी लांबीची एक मोठी किनारपट्टी आहे. महाराष्ट्रात पर्यटन वाढल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, आणि जागतिक स्तरावर भारत, मध्यपूर्व आणि युरोप यांच्यातील संबंध अधिक बळकट होतील.

तंत्रज्ञानाच्या विविध दृष्टीकोनांचा वापर करून, किनारपट्टीचा विकास कसा साधता येईल यावर विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सुमारे 48 बंदरे आहेत, त्यापैकी 15 बंदरे कार्यरत आहेत. या बंदरांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि शासनाच्यावतीने त्यांना योग्य मदत करुन त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न आहेत. वाढवण बंदरामुळे कनेक्ट होण्याची संधी मिळणार आहे. या बंदरामुळे 15 लाख पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

किनारपट्टीचा विकास आणि किनारी सुरक्षा, मच्छीमारी क्षेत्राचा विकास, वाहतूक आणि शहरांच्या पायाभूत सुविधा याबाबत मंत्री श्री.राणे यांनी यावेळी माहिती दिली.

0000

गजानन पाटील/स.सं