मुंबई, दि. 29 : परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंना योग्य त्या संवर्धनाची आणि विकासाची गरज आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. या माध्यमातून परभणी जिल्ह्याचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक स्तरावर नेता येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.
निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंचे संवर्धन व विकास कामांचा आढावा राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक अमोल गोटे व दुरदृश्य प्रणालीद्वारे परभणी जिल्ह्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यात असलेल्या सर्व बारवांना संरक्षित करण्यात यावे. चारठाणा गाव हेरिटेज गाव करण्यासाठी नियोजन करावे. तसेच धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या बाजूची जागा भूसंपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाला सहकार्य करावे, अशी सूचनाही राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर यांनी केली.
0000
मोहिनी राणे/ससं/