महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करु या - पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक  अर्चना पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, केशव गड्डापोड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो.  1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेंव्हा पासूनच राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही साजरा करीत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्वाचा वाटा आहे.

सध्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला हिंगोली जिल्हा दिनांक 1 मे, 1999 रोजी निर्माण झाला. आज आपल्या जिल्ह्याच्या स्थापनेचा देखील वर्धापन दिन आहे. विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा 65 वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, आणि पत्रकारांना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 7 कलमी कार्यक्रमाच्या ‘मिशन 100 दिवसा’च्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासकीय सुधारणा आणि गुंतवणूक प्रोत्साहन यावर भर दिला जात असल्याचे सांगून शासनाने ॲग्रीस्टॅक योजना सुरु केली असल्याचे सांगितले. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डाटा एकत्रित केला जाणार जात आहे. या डेटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 86 हजार 329 शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक तयार केले असून उर्वरित शेतकऱ्यांचे आयडी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे पालकमंत्री श्री.झिरवाळ यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने  लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015’ लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे. हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला असून जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रम राबवून हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने जिल्ह्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्तंगत दि. 19 एप्रिल रोजी रेल्वेने अयोध्या दर्शनाचा लाभ दिल्यामुळे त्यांची तीर्थदर्शनाची इच्छा पूर्ण झाली आहे, अशी माहितीही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी हिंगोली जिल्ह्यातील 148 गावांना शासनाने मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीमध्ये गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा लोकसहभागीय पध्दतीने तयार करण्याची सूक्ष्म नियोजन प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन संचासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे 4217 लाभार्थ्यांना 771 लाख 71  हजार रुपयाचे अनुदान अदा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 772 प्रकल्पांचे कर्ज मंजुरीचे प्रस्ताव विविध बँकाकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच 198 उद्योगांना 12 कोटी 45 लाख रुपये बँकाद्वारे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याचे सांगून हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे मा.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे काम चालू आहे. याचा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकरी, कंपन्या आणि हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तज्ञांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे वसमत हळद या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनांचा दर्जा प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात 8 ते 22 एप्रिल, 2025 या कालावधीत राष्ट्रीय पोषण पंधरवाडा राबविण्यात आला. या पंधरवाड्यांतर्गत माहे एप्रिल, 2025 अतंर्गत जन आंदोलन डॅश बोर्डवर ग्रामीण व शहरी भागातील 1197 अंगणवाडी केंद्र स्तरावर महिला व बाल कल्याण विभागाने आजपर्यंत 79 हजार 150 (प्रती अंगणवाडी केंद्र 66.12) उपक्रमांच्या ऑनलाईन नोंदी करुन राज्यात द्वितीय क्रमांक आला आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजना, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, आचार्य चाणक्य कौशल्य विकास कार्यक्रम अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 5 हजार 613 उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 2662 कार्य प्रशिक्षणार्थी घेत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून वैयक्तीक व्याज कर्ज परतावा योजनेचा 920 तर गट व्याज कर्ज परतावा योजनेचा 21 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील 15 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये 298 उमेदवारांना खाजगी आस्थापनेमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी दिली.

यावेळी शैक्षणिक कामासाठी सिंगापूर अभ्यास दौरा केलेले शिक्षक प्रदीप घोंगडे, एनआरसी डिजिटल आयुष्यमान भारत मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकीय अधिकारी गोपाळ कदम, अस्थिरोग तज्ञ डॉ.मनीष बगडिया, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी भाकरे, वैद्यकीय अधिकारी दंतरोग तज्ञ डॉ.फैसल खान यांचा पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेले पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, पोलीस गौसखान पठाण, माझी वसुंधरा अभियानात द्वितीय क्रमांक मिळाल्यामुळे मुख्याधिकारी अरविंद मुढे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अण्णाराव कांबळे, उप अभियंता कृषक तांबडे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच यावेळी कंपोस्ट खड्डा भरु आपले गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करुन करण्यात आले. हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी हिंगोली पोलीस विभागासाठी प्राप्त 13 वाहनाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुणगल, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.राजेंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******