सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर :  पालकमंत्री अतुल सावे

महाराष्ट्र स्थापनेचा ६६ वा स्थापना दिन  उत्साहात साजरा

  • जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना वेग द्यावा 
  • टॅक्टर अपघातातील मृतकांच्या परिजनांना सानुग्रह निधीचे वाटप
  • उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार 

नांदेड दि. 1 मे :- राज्य शासन नेहमी सामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. येणाऱ्या काळामध्ये शेती, माती, कृषी सोबतच अन्य सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासावर राज्य शासनाचा भर राहील ,असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

नव्या सरकारच्या गठनानंतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्राधान्याने भर असून जिल्ह्यात आतापर्यत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 812 कोटींची मदत करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना प्राधान्याने राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याची ग्वाही आज त्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिनानिमित्त आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील जनतेला त्यांनी संबोधित केले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपाचे महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर अन्य वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियाची उपस्थिती होती.

जिल्ह्यात मूल्य शेती अभियान सुरू असून केळी निर्यात संदर्भात कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत आहे. रेशीम शेती, फुल शेतीबाबतही शासनातर्फे जिल्ह्यामध्ये लक्ष घातले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम शिल्लक राहणार नाही यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी महसूल विभागाला दिले. तसेच अग्रिस्टॅक योजनेमध्ये सर्व शेतकरी यांनी नोंदणी करावी. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 जिल्हयात राबविण्यात येत आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात शासनाने सबसिडी जाहीर केली आहे. प्रत्येक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

जलसंधारणाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून पाऊस पडेपर्यंत कामे पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार टप्पा-2  मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरू असुन त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती” या अभियानालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्याचे हे दिवस असून संपूर्ण एक महिना आपल्या हातात आहे. जलसंधारणाच्या सर्व कामांना या काळात पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अनेक वर्षापासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. समृद्धी महामार्गाचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. याशिवाय नांदेड-वर्धा रेल्वे मार्गाचे भूसंपादन झाले आहे. शक्तिपीठ मार्गाच्या संदर्भातही स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या मागण्यांना समजून घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या अर्थकारणाला कलाटणी मिळणार असून त्यामुळे अशा मोठ्या प्रकल्पाला सकारात्मक दृष्टीने प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात ट्रॅक्टरची ट्रॉली विहिरीत पडल्यामुळे 7 शेतमजूर महिलांचा मृत्यू तर 3 शेतमजूर जखमी झाले होते.या दुर्घटनेचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

शंभर दिवसांच्या शासकीय कामकाज सुधारणा कृती आराखड्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने मराठवाडा विभागात पहिला क्रमांक व पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड कार्यालयाने पहिल्या तीनमध्ये क्रमांक मिळविल्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय नांदेड यांचे कार्यालय ई-ऑफिस करण्यात आले आहे. सर्व शासकीय कार्यालयात ई-फाईल्सचा वापर हळूहळु अनिवार्य केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले.  यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीता नंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर डॉ. आश्विनी जगताप, सेंकड इन कमांडर विजय कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद दल, दंगा नियंत्रण पथक, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक,  गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, राष्ट्रीय छात्रसेना,  अग्नीशमन दलाचे पथक, पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,  मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, दंगा नियंत्रक वाहन, वज्र वाहन,  अग्निशामक वाहन देवदूत यांचा पथसंचलनात सहभाग होता.

यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते क्षेत्रीय शासकीय/निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत कार्यालयीन सुधारणा विभागस्तरावर पोलीस विभागात प्रथम क्रमांक विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तर विभागस्तरावर महसूल विभागात प्रथम क्रमांक मिळल्याबद्दल राहुल कर्डिले यांना त्याचबरोबर राजीव गांधी गतीमानता (प्रगती) अभियान स्पर्धा पारितोषक 2024-25 साठी दुसरा क्रमांक कर्मचारी बदल्या ऑनलाईन पोर्टल मार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सन 2024 साठी पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह प्राप्त सोनखेड पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि.पांडुरंग माने, नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि.साईनाथ पुयड, देगलूर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. किरण कुलकर्णी, उस्माननगर पोलीस स्टेशनचे सुशील कुबडे, वजिराबाद पोलीस स्टेशनचे गजानन कदम, नागरी हक्क संरक्षण विभागातील व्यंकट शिंदे, कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे पो.उप.नि.गजेंद्र मांजरमकर, गुन्हे अन्वेषन विभागाचे पो.हे.कॉ. विनायक किरतने, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे चंद्रकांत पाटील, सद्या पिंपरी चिंचवड पो. आयुक्तालयातील सुधीर खोडवे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेला आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील तलाठी गोविंद काळे यांचा 5 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडा विभागामार्फत श्री शिवछत्रपती पुरस्कार सन 2022-24 प्राप्त आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू अजय पेंदोर, पॅरा ऑलम्पिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू म्हणून लताताई उमरेकर यांचा सत्कार तर युवा पुरस्कार सन 2024-25 संदीप कळासरे यांना पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, नदी स्वच्छता, पथनाट्य सादरीकरण, बालविवाह प्रतिबंध पशुपक्षी संरक्षण आदी कार्याबद्दल 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व श्रीमती अंजली नातु यांनी केले.

तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

0000