- अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्या देशबांधवांना श्रद्धांजली
- उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
लातूर, दि. ०१ : लातूर जिल्हा विविध क्षेत्रात नवनवीन उंची गाठत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदना कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी उपस्थितांना तसेच लातूर जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली.
लातूर येथे लवकरच अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागणार आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हृदयरोग, मेंदूविकार यांसारख्या उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रेही अधिक सक्षम केली जात असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यांनी नमूद केले.
सर्वसामान्य गरजूंना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येत आहे. या कक्षामुळे गरजू आणि गरीब रुग्णांना शासकीय वैद्यकीय आणि इतर मदतीसाठी अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि पाठपुरावा करणे सुलभ होणार आहे. विशेषतः गरीब, दिव्यांग, गंभीर आजारांनी त्रस्त रुग्ण तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबांना याचा थेट लाभ मिळेल. जिल्हास्तरावर ही सेवा उपलब्ध झाल्याने प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होणार असून, ही योजना शासनाच्या संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळाले आहे. यावर्षीपासून ही योजना तालुकास्तरावर राबविली जाणार असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.
मनरेगा अंतर्गत फलोत्पादनासाठी फळबाग लागवड योजना राबविली जात आहे. जलयुक्त शिवार अभियान, नवीन सिंचन प्रकल्प आणि जलसंधारणासाठी प्रगत उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याशिवाय, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान आणि ‘अमृतधारा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून, ग्रामीण भागासाठी १७ कोटी ७० लाख रुपये आणि नागरी भागासाठी ३ कोटी १६ लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी नमूद केले.
उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रातही लातूरने नवे पर्व सुरू केले आहे. जिल्हा गुंतवणूक परिषदेत अनेक उद्योग समूहांशी करार झाले असून, यामुळे तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. दळणवळण सुविधा वाढविण्यासाठी लातूर विमानतळाच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रस्ते, वीज, जलसंपदा आणि पायाभूत सुविधांचा विकास साधला जात आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचा उत्साहवर्धक सहभाग आहे. यामुळे विकासकामांना गती मिळाली आहे. जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक नवीन रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत, याचा पालकमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.
पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका यांच्यासह विविध शासकीय विभागांचे चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांची पालकमंत्री श्री. भोसले यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या विविध विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
००००