परभणी, दि.1 (जिमाका) – मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातच तळ मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार संदीप राजापुरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, वैद्यकीय अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉ.बालाजी इपर, सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य संदीप निळकंठे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरीता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या पैशाचा व वेळेचा अपव्यव टाळण्याकरिता हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
00000