मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन

अमरावती, दि. १ : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कक्षाच्या माध्यमातून आता गंभीर व खर्चिक आजारांवर उपचारासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी, एक खिडकी प्रणालीद्वारे दिला जाणार आहे. यापूर्वी या सेवेसाठी नागरिकांना मंत्रालय गाठावे लागत होते, मात्र दि. १ मे २०२५ पासून ही सुविधा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध झाली असून लवकरच ती ऑनलाईन स्वरूपातही सुरू होणार आहे.

दि. २७ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान एकूण ४७ रुग्णांनी कक्षाशी संपर्क साधला आहे. त्यापैकी १५ जणांवर मेंदू, कॅन्सर, प्लास्टिक व हृदयविकार अशा जटिल आजारांवरील मोठ्या शस्त्रक्रिया करून लाभ देण्यात आला. उर्वरित रुग्णांना मोफत औषधोपचार व मोफत कंजर्वेटिव्ह मॅनेजमेंट करता भरती करणे व इतर वैद्यकीय लाभ मिळवून देण्यात आले आहे.

या कक्षा अंतर्गत राबवण्यात येणारी ‘आरोग्यदूत’ संकल्पना गावागावात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य आहे.

यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक डॉ. निलेश खटके, कक्षाचे अध्यक्ष व तज्ज्ञ डॉक्टर डॉ. श्याम गावंडे, समाजसेवा अधीक्षक पवन गुल्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी फित कापून उद्घाटन केले. त्यांनी कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000