मुंबई, दि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. धैर्याने पुढे येण्यासाठी, एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी चळवळ उभी करण्याचे आवाहन इस्त्राइलच्या अभिनेत्री रोना ली शिमोन यांनी केले. या चळवळीत समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण हे माध्यम महिलांना त्यांचा आवाज आणि कथा सामायिक करण्याची ताकद देतो, असेही त्यांनी सांगितले.
बीकेसी मुंबई येथे वेव्हज २०२५ जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये “प्रतिकूल परिस्थितींना धैर्याने सामोरे जात, एका कथेची नवीन पटकथा लिहिणे” या विषयावरील चर्चासत्रात सुप्रसिद्ध इस्रायली अभिनेत्री रोना-ली शिमोन, इटालियन मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी, माजी जर्मन फुटबॉलपटू आणि विश्वविजेती एरिअन हिंगस्ट यांनी सहभाग घेतला.
रोना-ली शिमोन यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र यावे, धैर्याने व एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने न घाबरता उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. इथल्या प्रत्येक वक्त्याने वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना केला आहे आणि त्यांचा आयुष्य़ावर परिणाम होऊ देण्याऐवजी त्यांनी त्या क्षणांचा उपयोग स्वतःची कथा नव्याने लिहिण्यासाठी केला आहे. वेव्हज २०२५ याच गोष्टीचे प्रतीक आहे. अशा व्यक्ती जे केवळ आव्हानांना सामोरे जात नाही, तर त्यांना परिवर्तन आणि प्रेरणेसाठी व्यासपीठात रूपांतरित करतात.
एरिअन हिंगस्ट हिने पुरुषप्रधान खेळात व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आपला प्रवास सांगितला. लिंगभेदावर मात करून जगज्जेता बनण्याबाबत आणि आता खेळांमध्ये निष्पक्षता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ती करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तिने माहिती दिली. पुरुषांच्या तुलनेत महिला फुटबॉलला प्रसारमाध्यमांकडून मिळणारी कमी प्रसिद्धी आणि योग्य व्यासपीठांचा अभाव असल्याची बाब तिने अधोरेखित केली आणि महिला खेळाडूंना समान संधी आणि ओळख मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.
मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी हिने बरे झाल्यानंतर कामावर परतण्याची तिची यशकथा सांगितली. मॉडेलिंग उद्योगात महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तफावत, महिला मॉडेल्सना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा मिळणारे कमी पैसे, यामुळे माध्यमांत अजूनही पुरूषप्रधान संस्कृती असल्याचे तिने स्पष्ट केले. समाजमाध्यमांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद असल्याचे तिने सांगितले.
000
सागरकुमार कांबळे/ससं/