“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” – शिबाशिष सरकार
सर्जनशीलतेत जोखीम घेणे आवश्यक असले तरी, आशय संग्रह संतुलित आणि संरचित असला पाहिजे – एकता कपूर
मुंबई, २ :-आज मुंबईत आयोजित “जागतिक चित्रपट आणि प्रदर्शन अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका” या विषयावरील मुख्य सत्रात मीडिया आणि कंटेंटचे भविष्य घडवणारे प्रमुख एकत्र आले होते. यात इरॉस नाऊ (एक्सफिनाइट ग्लोबल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम तन्ना; प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशिष सरकार; बालाजी टेलिफिल्म्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एकता आर. कपूर; तसेच गुगलच्या अँड्रॉइड टीव्हीच्या उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शालिनी गोविल पै यांचा समावेश होता.
भारताच्या कथात्मक मांडणीच्या खोलवर रुजलेल्या परंपरेवर प्रकाश टाकताना, शिबाशिष सरकार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या एक शतक जुन्या प्रवाहापासून आजच्या गतिमान स्ट्रीमिंग व्यासपीठापर्यंतच्या उत्क्रांतीबद्दल माहिती दिली. स्ट्रीमिंग व्यासपीठामुळे भारतीय कथांना जागतिक प्रेक्षक मिळू शकले आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, आशयाचा सीमेपलीकडे खऱ्या अर्थाने प्रवास घडण्यासाठी, भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. संस्थात्मक भांडवल सहयोगासाठी केंद्रित, संपूर्ण भारत या दृष्टिकोनाचे आवाहन त्यांनी केले.
आकर्षक कथात्मक मांडणीहे जागतिक यशाच्या केंद्रस्थानी आहे हे अधोरेखित करताना एकता आर. कपूर यांनी कथा जितकी अधिक हृदयाशी जवळ आणि भावनिकदृष्ट्या प्रगल्भ असेल तितकीच ती आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी जोडली जाण्याची शक्यता जास्त असते यावर भर दिला. वेदना, उत्कटता आणि आशा यासारख्या भावना सार्वत्रिक असतात, असेही त्यांनी सांगितले. सर्जनशीलतेत जोखीम घेणे आवश्यक असले तरी, गुंतवणूक जोखीम कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक परिसंस्थेत दीर्घकालीन व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी आशय संग्रह संतुलित आणि संरचित असला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
जागतिकीकरण हा आजच्या आशयनिर्मितीतील सर्वात परिवर्तनकारी प्रवाह आहे, असे शालिनी गोविल पै यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे वितरणातील अडथळे दूर झाले असून कथात्मक मांडणीचा जागतिक स्तरावरील प्रसार सुलभ झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे निर्मितीची प्रक्रिया वेगवान, प्रभावशाली व माहिती आधारित झाली असून आशयनिर्मितीमध्ये क्रांतिकारक बदल घडवत आहे. भारतीय आशय निर्मात्यांनी पारंपरिक पद्धतीच्या पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे जागतिक स्तरावर सर्वांना भावतील अशा आशयघन कथांचे सादरीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक काळात कंटेंट डिस्कव्हरी महत्त्वपूर्ण होत आहे आणि यशाची पुढील लाट स्मार्ट नेव्हिगेशन, डिस्कव्हरेबिलिटी आणि तंत्रज्ञानाधारित कथाकथनावर अवलंबून असेल, असे त्या म्हणाल्या.
भारताचा डिजिटल संस्कृतीला सरावलेल्या प्रेक्षकवर्गासाठी आता कथाकथनाच्या रचनेत बदल करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण विक्रम टन्ना यांनी नोंदवले. प्रेक्षकांचा लक्ष केंद्रित राहण्याचा कालावधी कमी होत असून मोबाईलचा वापर वाढत चालला आहे, त्यामुळे नवीन आशयातील आवाज, मतप्रवाह व लक्ष वेधून घेण्याची क्षमता महत्वाची ठरेल, असे ते म्हणाले. यशासाठी तीन महत्वाच्या प्रवाहांचा त्यांनी उल्लेख केला: तंत्रज्ञानाची नवीन परिभाषा, अनुभवाधारित कथाकथन व निष्ठावंत चाहत्यांना आकर्षित करणारे आयपी तयार करणे. जेन ए आय ही आशयनिर्माते व व्यासपीठांसाठी क्रांतिकारक संधी असून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे, उत्पन्न मिळवणे व आवडीनुसार सर्वांना काहीतरी आशय मिळवून देणे यासाठी नवनवीन मार्ग प्रदान करते.
भारत जागतिक स्तरावर कंटेंट पॉवरहाऊस अर्थात आशयनिर्मितीची गंगोत्री बनण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. पायाभूत सुविधांमध्ये योजनाबद्ध गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर व मौलिक तसेच गुणवत्तापूर्ण कथा सादरीकरणाप्रती वचनबद्धता असल्यास जागतिक माध्यमांच्या नवोन्मेषात भारत सहज नेतृत्व करू शकतो , असा निष्कर्ष या सत्राच्या शेवटी समोर आला.