समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे

मुंबई दि. ४ : समाजमाध्यमांतील इनफ्लुएंसर्सने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती  एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचना, नियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजे, असेही यावेळी सांगितले.

विनय पिल्लई म्हणाले, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना त्या प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती नीट समजून घेऊन त्या चौकटीत आपले सादरीकरण करावे. कारण प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैशिष्ट्यांची ओळख करून त्यानुसारच कंटेंट बनवावा. स्वतःची विशिष्ट ओळख  विकसित करावी. सोशल मिडिया प्रभावी असले तरी दूरचित्रवाणी आजही प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

मयंक शेखर यांनी विश्वास व विश्‍वासार्हता निर्माण करण्याची गरज असून  सातत्याने अधिकृत माहिती मांडणे म्हणजे विश्‍वासार्हतेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. प्रभावी व्यक्तींनी केवळ ट्रेंड फॉलो न करता, योग्य आवश्यक बाबी मांडल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

तनू बॅनर्जीं यांनी माध्यमे सतत बदलत आहेत, त्यामुळे इन्फ्लुएंसरनेही आपल्या कार्यपद्धती बदलायला हवी. ग्राहकांना शिक्षित करणे व सजग ठेवणे देखील प्रभावी व्यक्तींची जबाबदारी आहे, असे सांगितले.

0000

वंदना थोरात/विसंअ/