अहिल्यानगर, दि.६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, अहिल्यानगर शहरात ही एक देखणी वास्तू निर्माण झाली आहे. या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि इमारतीची देखभाल योग्य पद्धतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
असे आहे नवीन शासकीय विश्रामगृह…
अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले असून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. यासाठी ६ कोटी ७५ लाख रुपये खर्च आला. यामध्ये तळमजल्यावर २ व्हीव्हीआयपी कक्ष,१ व्हीआयपी कक्ष, भोजन कक्ष, बैठक कक्ष, स्वयंपाकगृह, भांडार, स्वागत कक्ष आहेत. पहिल्या मजल्यावर २ व्हीव्हीआयपी व ३ व्हीआयपी कक्ष असून ७५ व्यक्तींची क्षमता असलेले सभागृहही उभारण्यात आले आहे.
अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता इमारतीचे भूमिपूजन
अहिल्यानगर येथील बांधकाम भवन येथे अधीक्षक अभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता व उप अभियंता कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
१३ कोटी ३१ लक्ष ४२ हजार ८३८ रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेली ही इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर कार्यकारी अभियंता कार्यालय, उपविभागीय कार्यालय असून तिसऱ्या मजल्यावर अधीक्षक अभियंता कार्यालय, बैठक कक्ष, सभागृह, अभिलेख कक्ष उभारण्यात येणार आहे.