प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,  दि. ७  : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती बस मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे प्रवाश्यांच्या वेळेची बचत होईल आणि सोयीस्कर प्रवास करणे त्यांना शक्य होणार आहे. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने  एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. प्रवाश्यांना  या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या डिजिटल उपक्रमाचे स्वागत केले आणि त्याचे कौतुक केले.

‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हणाले, गुगल मॅपसोबतच्या सहकार्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाची आखणी अधिक सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहे.” या सहकार्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरच बस कुठे आहे, किती वेळात येईल, विलंब झाला आहे का, याची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपवर ही माहिती हिरव्या आणि लाल रंगात दाखवली जाईल.  हिरवा रंग वेळेत येणाऱ्या तर लाल रंग उशीर होणाऱ्या बसेस दर्शवेल.

गुगल मॅप्सच्या भारत प्रमुख रोलि अग्रवाल म्हणाल्या, बेस्टसोबतच्या या सहकार्यामुळे आम्ही मुंबईतील प्रवाशांना रिअल-टाईम सार्वजनिक वाहतूक माहिती देण्यास सक्षम झालो आहोत. सार्वजनिक वाहतुकीची अचूक आणि संपूर्ण माहिती देणे हे गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे आणि हे सहकार्य त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हा उपक्रम गुगलच्या भारतभरातील सार्वजनिक वाहतुकीची माहिती सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. सध्या गुगलने भारतातील १५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो, ट्रेन, बस यांसारख्या वाहतूक सेवांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. गुगल मॅपच्या सेटिंग्जमध्ये किंवा फोनच्या भाषेच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वापरकर्ता आपली भाषा निवडू शकतो.

महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सविस्तर सादरीकरण केले.

प्रवाशांनी रिअल-टाईम बस माहिती पाहण्यासाठी ही पद्धत वापरावी:

  • आपल्या Android किंवा iOS डिव्हाईसवर Google Maps अ‍ॅप उघडा.
  • आपल्या प्रवासाचे गंतव्यस्थान टाका आणि ‘Go’ आयकॉनवर क्लिक करा.
  • ट्रामच्या चिन्हावर टॅप करून ‘Public Transport’ मोड निवडा.
  • सुचवलेली सेवा निवडून बसचे थांबे आणि रिअल-टाईम माहिती तपासा.
  • एखाद्या बस स्टॉपसाठी सर्च करूनही रिअल-टाईम बस माहिती पाहता येईल.