नाशिक, दि. ८ : महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते. या वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली.
राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद, नाशिक यांच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरण व विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा आज सकाळी महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, कायनेटिक ग्रीनचे रितेश मंत्री आदी उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ई पिंक रिक्षा नागपूर, पुणेनंतर नाशिक येथे वितरण होत आहे. या रिक्षामध्ये जीपीएस सिस्टिम कार्यान्वित करून दिली आहे. तसेच या महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. या रिक्षांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. चार्जिंग केंद्रांवर महिलांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच या रिक्षांचा उबेर, ओला पोर्टलवर समावेशसाठी करार करण्यात येईल. याबरोबरच शक्य तेथे या रिक्षा चालक महिलांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
महिला व बालविकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थी आहेत. बाळाच्या नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून
अंगणवाडीत वीज, शौचालय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत थ्रीडी अंगणवाडीच्या उपक्रमाचे मंत्री कु. तटकरे यांनी कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात महिला व बालविकास विभाग प्रथम आला. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. लेक लाडकी योजनेविषयी अधिकाधिक जनजागृती करावी, असेही आवाहन मंत्री कु. तटकरे यांन केले. मंत्री कु. तटकरे यांनी आदिशक्ती समिती, आदिशक्ती पुरस्कार याविषयी माहिती दिली.
आमदार श्री. भुजबळ म्हणाले की, राज्य शासनातर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, पिंक ई रिक्षा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. महिला सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरेल. सर्व अंगणवाडीत वीज जोडणी झाली आहे. किलबिल उत्सव राबविण्यात येत आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पाठपुरावा संगणकीय प्रणालीची माहिती डॉ. राजेंद्र बागूल यांनी माहिती दिली. सहाय्यक आयुक्त श्री. पगारे यांनी आभार मानले. लेक लाडकी योजना लाभार्थी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थींना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे रूपे कार्ड वितरण, स्वयंम सहायता बचत गट, बचत गट लोगो अनावरण, बालविवाह प्रतिबंध कार्य केल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार, आशा स्वयंसेविका सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.