नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी आणि दळण- वळणाच्या सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करतानाच उपकेंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकीकृत विकास आराखड्याच्या प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
मंत्री श्री. पाटील यांनी आज दुपारी शिवनई शिवारातील उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष निकम, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, डॉ. राजेंद्र विखे पाटील, बागेश्री मंथळकर, देविदास वायदंडे, नितीन घोरपडे, संदीप पालवे, सिनेट सदस्य विजय सोनवणे, प्राचार्य श्री. भांबर, संपत काळे, सचिन गोरडे, बाकेराव बस्ते आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसराचा सर्वांगीण विकासाचे नियोजन करावे. त्यासाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा. उपकेंद्राच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घ्यावा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. वैद्य यांनी उपकेंद्राची माहिती देतानाच परिसरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.