सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढत आहे. शिवाय उत्पादन खर्च कमी होण्यास देखील मदत झाली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीची प्रक्रिया देखील सोपी आणि कार्यक्षम होत असल्याने आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री रावराणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे आदी उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तयार केलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांचे QR Code फलकाचे विमोचन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात झाले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती नाईकनवरे यांनी खरीप हंगाम सन 2025-26 मध्ये नियोजित योजना व कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
पालकमंत्री म्हणाले की, कमी खर्चात उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. भात शेती किंवा इतर पिक घेताना नवीन प्रयोग करण्यावर भर द्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन द्या. प्रत्येक ग्राम व तालुका स्तरावरील प्रयोगशील तसेच प्रगतशील शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करून जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश दिले. तसेच विभागाने विविध कृषी योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध प्रचार व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून कृषी उत्पादनामध्ये शाश्वत वाढ करण्याचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना नवीन नवीन पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात नवीन काय करता येईल यासाठी सर्व कृषि विभागाने आराखडा तयार करावा. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावीत. याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ देऊ नये, याची दक्षता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असेही त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2025 चे नियोजन :-
खरीप हंगामातील भातपिकासाठी 56255 हेक्टर क्षेत्रावर नियोजन
तांदूळ उत्पादकता – 3100 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष
खरीप हंगामातील नाचणी पिकासाठी 1217 हेक्टर क्षेत्रावर नियोजन
नाचणी पिकासाठी 2500 किलोग्रॅम/हेक्टर उत्पादनाचे लक्ष
भात बियाणे मागणी – 9351.84 क्विंटल आज अखेर पुरवठा – 3187 क्विंटल
खते मागणी – 19557 मे.टन – आज अखेर उपलब्धता -2601 मे.टन
निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरीता जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. जिल्हा स्तरावर तालुका स्तरांवर कृषि निविष्ठा तक्रार कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे.