निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायो-डायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणार काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथील गोरेवाडा परिसरात सुमारे 3 लाख स्केअर मीटर क्षेत्रावर हा पार्क साकारण्याबाबत आज प्राथमिक आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य संदीप जोशी, मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त बी वैष्णवी, ग्रिन यात्राचे प्रदीप त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

असा असेल बायो-डायव्हर्सिटी पार्क

निसर्गाशी जवळीकता साधत त्याच्या जपवणूकी विषयी सर्वच धर्माने भर दिला आहे. यातील तत्व लक्षात घेऊन हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्त्वांवर उभारला जाईल. यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाची, शिक्षणाची संधी मिळेल. कृषी, विज्ञान, वन, जैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल. पूर्वापार चालत आलेली व या मातीत एकरुप असलेली विविध प्रकारची झाडी इथे लावली जाईल. सुमारे दिडशेपेक्षा अधिक बांबूच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केले जाईल.

आध्यात्मिक अनुभूतीसह या पार्कमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धनावर भर राहील. देवराई वन, नक्षत्र वन, राशी वन, औषधी वनस्पती संशोधन व संवर्धन, फुलपाखरु व काजवे असलेले वन, विविध मातींचे वैविध्य जपणारे दालन, पर्जन्यमापन, दिशा शास्त्र, योगा झोन, पीस झोन, फॅमिली झोन, मानसशास्त्र, आरोग्य या प्रमुख घटकांशी अंर्तमुख करणारा हा पार्क राहील.

00000