महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे – पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

 महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ

सांगली, दि. 19 (जि. मा. का.) :  महसूल विभाग हा शासनाचा कणा व चेहरा आहे. गावस्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत जे महसूल अधिकारी काम करतात, त्यांच्या कामामधून शासनाच्या ध्येय धोरणाचे, कार्यपध्दतीचे दर्शन लोकांना घडत असते. यामुळे शासनाच्या सेवेत आपल्यावर असणारी जबाबदारी अतिशय चोखपणे, अचूकपणे व मानवतावादी दृष्टीकोन ठेवून पार पाडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हे प्रशिक्षण होत आहे. शुभारंभ सत्रात प्रत्यक्षरीत्या जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) डॉ. स्नेहल कनिचे, प्रशिक्षक उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, ॲड. प्रविण भांगे, तहसिलदार अमोल कुंभार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रशिक्षणामुळे आपली क्षमता वृध्दिंगत होते. अशा प्रकारची प्रशिक्षणे फक्त नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर इतरांनाही वर्षातून किमान एकदा रिफ्रेशर कोर्स म्हणून घेण्याच्या सूचना करून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभागाच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली, जबाबदारी, कर्तव्य समजून घ्यावे, असे ते म्हणाले.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, प्रशिक्षणार्थींनी जमीन महसूल संहिता व त्या अनुषंगाने असलेले सर्व नियम, फेरफार नोंदणी, डिजीटल स्वाक्षरी, लोकांना सेवा देण्याबाबतची कार्यपध्दती, जमीनविषयक अन्य कायद्यांची तोंडओळख प्रशिक्षणामध्ये करून द्यावी. तलाठ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जमीन विषयक माहिती, भूसंपादन केलेल्या जमिनी, निर्बंध असलेल्या जमिनी यांची सविस्तर माहिती करून घ्यावी. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येकाच्या कामाचे प्रत्येक तीन महिन्याने मूल्यमापन करावे, असे त्यांनी सूचित केले.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, शासनाने व जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा. कलम 155 चा गैरवापर होणार नाही, सरकारी जमिनीचा गैरव्यवहार, निर्बंध असलेल्या जमिनीचे व्यवहार होणार नाहीत, कुठल्याची प्रकारची चुकीची नोंद घेतली जाणार नाही. तसेच ती पुढे पाठविली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. काही चुकीचे आढळल्यास तात्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे त्यांनी सूचित केले.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, तलाठ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांशी सुसंवाद ठेवावा. निवडणूक प्रक्रिया पार पाडतानाही ती अचूकपणे पार पाडावी. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपले शासकीय कर्तव्य अचूक पार पाडावे. कोणतीही अडचण असल्यास ती कुटूंब प्रमुख म्हणून सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, प्रशिक्षण म्हणजे मानवी संसाधनातील गुंतवणूक आहे. प्रशिक्षणात दिलेल्या माहितीच्या नोटस् काढाव्यात. नियम बारकाईने आत्मसात करावेत. प्रशिक्षणामुळे दृष्टी येते. कायद्यानुसार अचूकपणे काम पार पाडावे. अनावधानानेही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येकाला राज्यगीत तसेच संविधानाचे प्रास्ताविक तोंडपाठ असले पाहिजे. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा घेऊन याबाबतचे मूल्यमापन केले जाईल व विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाईल.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, गतिमान प्रशासकीय अभियानांतर्गत महसूल अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. नेमणूकीपासून तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी झालेल्या सांगली जिल्ह्यातील 92 तलाठी व 4 लिपिक यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदी,  कूळकायद्याच्या विविध तरतुदी, सिलींगच्या विविध तरतूदी, संगणकीकृत सातबाऱ्याच्या विविध तरतुदी, सहा बंडल सिस्टीम, वर्कशीट आदीच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजयकुमार पवार यांनी आभार मानले. प्रशिक्षणास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, नवनियुक्त तलाठी उपस्थित होते.

0000