बारामती, दि.२२: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शासकीय संस्थेकरिता उद्योजकांच्यावतीने देण्यात आलेल्या पिण्याचे पाणी साठवणुकीकरिता १ हजार लिटर क्षमतेच्या ६० टाक्या वितरित करण्यात आल्या.
पंचायत समिती परिसरात आयोजित कार्यक्रमाच्यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, गट शिक्षण अधिकारी निलेश गवळी, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, उद्योजक आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक शाळा आणि पशुसंवर्धन दवाखान्यांना १ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे अंगणवाडीतील बालक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.
आगामी मान्सून काळात स्थानिक पातळीवर स्वच्छता, पाणी, आजारांवर त्वरित उपचार, आवश्यकतेनुसार कीटकनाशकांची फवारणी आदी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतींनी कराव्यात, अशा सूचना श्री. पवार यांनी यावेळी केल्या.
यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते शरद सूर्यवंशी, खंडु गायकवाड, सुरेश परकाळे, दिलीप भापकर, प्रशांत जगताप आणि शंकर साळुंखे या उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
एमआयडीसी प्रादेशिक कार्यालय आणि पंचायत समिती यांचा संयुक्त प्रयत्न
उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद
बारामती पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाने शासकीय संस्थांना पिण्याच्या पाणी साठवणूकीकरिता टाक्या मिळण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योजकांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यालयाच्यावतीने आवाहन केले असता, उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला या ६० टाक्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.
0000