आपत्तीकालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसादासाठी ‘एनडीआरएफ’ची पथके रवाना – आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके

मुंबई, दि. २६ :- भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथा येथे पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट दिला असल्याने राज्यात मान्सूनपूर्व  पावसामुळे अतिवृष्टीची शक्यता गृहीत धरून आपत्तीच्या परिस्थितीमध्ये प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी मुंबई-२, रायगड-१, ठाणे-१, तसेच पालघर, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हयांत प्रत्येकी १ ‘एनडीआरएफ’ची पथके तत्काळ रवाना केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.

श्री. खडके यांनी सांगितले,  दरवर्षी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके १ जूनपासून तैनात केली जातात. तथापि यावर्षी मान्सुनचे वेळेपूर्वी आगमन झाल्याने आणि अतिवृष्टीची शक्यता विचारात घेता  आपत्तीमध्ये मदत व बचाव कार्यासाठी ही पथके तत्काळ रवाना करण्यात आली आहेत.

आपत्तीमध्ये सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज असल्याचे संचालक श्री. खडके यांनी सांगितले.

सचेत अॅपमार्फत सद्यस्थितीमध्ये पावसाचे अतिवृष्टीचे अलर्ट पाठविले जात असून २३ अलर्ट पाठविले आहेत. ज्यामध्ये ९ कोटी ५० लाख  इतके एसएमएस नागरिकांना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये (काटेवाडी) दि.२५ मे व २०२५ रोजी अवकाळी अतिवृष्टी झाल्यामुळे २ एनडीआरएफ ची पथके इंदापूर व बारामतीसाठी त्याच दिवशी रवाना करण्यात आली होती. इंदापूर आणि काटेवाडी येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन दलाच्या चमूमार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात कुरबावी गावालगत ६ नागरिक अडकले होते. या नागरिकांना ‘एनडीआरएफ’चे पथक रवाना करुन त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.  सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात दहिवडी-फलटण रस्त्यावर पूरसदृश्य अतिवृष्टीमुळे प्रवासी अडकले असता त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवून निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अतिवृष्टीमुळे फलटण, बारामती भागात निरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

आपत्कालीन परिस्थितीत मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल ९३२१५८७१४३ आणि १०७० उपलब्ध असून मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातील  संपर्कासाठी कार्यकेंद्रामध्ये २४x७ अधिकारी/कर्मचारी उपस्थित असल्याचेही संचालक श्री. खडके यांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्कालीन परिस्थितीत राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत आपत्कालीन परिस्थितीत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व मदतकार्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.

00000

एकनाथ पोवार/विसंअ/