आरोग्य सुविधांच्या उपलब्धततेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा  – विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

रुग्ण कल्याण नियामक समितीची बैठक संपन्न; आरोग्य सोयी-सुविधांचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

 अमरावती, दि. 26 : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात विभागातून तसेच परराज्यातून दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या रुग्णालयात एकाच ठिकाणी मोठ्या आजारावर वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध आहे, याचा समाजातील गोर-गरीब रुग्णांना लाभ व्हावा, यासाठी यंत्रणांनी वैद्यकीय उपचार सेवा-सुविधांमध्ये आणखी चांगल्याप्रकारे वाढ करावी. आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता होण्यासाठी वाढीव निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा रुग्ण कल्याण नियामक समितीच्या अध्यक्ष श्वेता सिंघल यांनी आज येथे दिले.

येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण नियामक समितीची सभा आज संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सौ. सुलभाताई खोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे तसेच समितीचे सदस्य महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सराटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहन पाटील, उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर आदी यावेळी बैठकीला उपस्थित होते.

याप्रसंगी बैठकीत सर्वप्रथम  12 एप्रिल 2023 रोजी संपन्न झालेल्या रुग्ण कल्याण नियामक समितीच्या सभेचे इतिवृत्त समितीला वाचून दाखविण्यात आले. मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नियोजित कामांच्या यादीतील प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच 2025-26 या आर्थिक वर्षात होणाऱ्या खर्चाचे नियोजन समितीसमोर सादर करण्यात आले. गत तीन वर्षांतील वैद्यकीय उपचार व सोयी-सुविधांवर झालेल्या खर्चाचा विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी आढावा घेतला, त्या म्हणाल्या की, ज्या बाबींसाठी निधी प्राप्त झाला आहे, त्याच बाबीवर तो खर्च करण्यात यावा, इतर बाबींवर खर्च करु नये. रुग्ण कल्याण नियामक समितीला प्राप्त होणाऱ्या निधीतून रुग्णालयाच्या देखभाल व दुरुस्तींची कामे करावीत. सीएसआर फंड उपलब्ध करून देणाऱ्या विविध संस्था यांच्याकडून रुग्णालय व रुग्णहिताच्या दृष्टीने आवश्यक सेवा-सुविधा, उपाययोजना करुन घ्याव्यात. आगामी पावसाळा लक्षात घेता अनेक सुविधा तसेच देखभाल व दुरुस्तींच्या कामांचे सुयोग्य नियोजन करून अत्यावश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावीत. तात्पुरत्या सुधारणा करू नयेत, कायमस्वरूपी तोडगा काढून सर्व आरोग्य सुविधांची तजवीज करुन ठेवावी. रुग्‍णालयात वीज पुरवठा चोवीस तास सुरु राहण्यासाठी विद्युत विभागाने नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त सिंघल यांनी यावेळी दिले.

आमदार सौ. खोडके म्हणाल्या की, सुपरस्पेशॉलिटी रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी फेज-3 मधील विकासकामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये फेज – ३ अंतर्गत गॅस्ट्रॉलॉजी, लिव्हर ट्रान्सप्लाँट विभाग, कान-नाक-घसा व त्वचा आजारासंदर्भातील युनिट सुरु करण्यासाठी त्यांच्याकडून सर्वोतोपरी प्राधान्य दिले जाणार असल्याचे आमदार सौ. खोडके यांनी यावेळी सांगितले. फेज-3 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या विभागांसाठी आयटीआय नजीकची जागा नियोजित करण्यात आली असल्याने तेथील कामांसंदर्भात आवश्यक नियोजन, आराखडा तयार करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या. अमरावती विभागातून येणाऱ्या सर्व गरजू, गरीब रुग्णांना आवश्यक वैद्यकीय उपचार व सोयी-सुविधा प्राधान्याने पुरविण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला केली.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर करून खर्चाचे अंदाज पत्रक मांडले. त्यास समितीच्या वतीने मान्यता देण्यात आली. यावेळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल च्या फेज- १ व फेज-२ मध्ये सुरु असलेल्या युरोलॉजी, किडनी ट्रान्सप्लांट, नेप्रोलॉजी, पेडियाट्रीक विभाग तर फेज2-मध्ये न्युरो सर्जरी, कार्डियाक विभाग, कॅन्सर विभाग येथे रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येक विभागातील खाटांची संख्या वाढविणे व आवश्यक वैद्यकीय संसाधने पुरविण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी दिली. त्यावर समितीने सकारात्मकता दर्शवित प्रस्ताव शासनास सादर करण्याचे सुचविले. खाटांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन समितीने यावेळी दिले. परिचारीकांची रिक्त पदे रोजंदारी पध्दतीने भरण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

0000