आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ अंतर्गत, तसेच इतर कामगार कायद्यातील तरतुदीनुसार सुरक्षा रक्षकांना असणारे सर्व लाभ या आस्थापनांनी अदा करणे बंधनकारक आहे. मात्र सुरक्षा मंडळात नोंदीत नसलेल्या आस्थापना खासगी सुरक्षा रक्षकांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत जिल्हानिहाय तपासणी मोहीम राबविण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
खासगी सुरक्षा रक्षकांच्या हक्काबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये किशोर जोरगेवार, महेश शिंदे, प्रशांत बंब, सुलभा गायकवाड यांनी सहभाग घेतला.
या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले, कामगार विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. लवकरच विभागात भरती करण्यात येणार आहे. कामगार कायद्याअंतर्गत आस्थापनांची नोंदणी करण्यात येते. सुरक्षा मंडळांकडे नोंदीत आस्थापना आहेत. मात्र गृहनिर्माण संस्था सुरक्षा मंडळाकडे नोंदीत नाहीत. त्यामुळे अशा संस्थांकडे खासगी सुरक्षा रक्षकांच्या हक्काबाबत तातडीने तपासणी करण्यात येईल.
0000
नीलेश तायडे/विसंअ/
थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर
मुंबई, दि. ३ :- थॅलेसेमिया आजाराची योग्य वेळी तपासणी, उपचार आणि रुग्णांचे समुपदेशन केल्यास हा आजार पुढील पिढ्यांपर्यंत जाणार नाही. थॅलेसेमियाविषयी अधिक सजग करण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विशेष कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली.
या संदर्भात सदस्य विकास ठाकरे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री रणधीर सावरकर, राहुल पाटील, योगेश सागर, प्रविण दटके, अमित देशमुख, बाबासाहेब देशमुख, महेश शिंदे आणि मोनिका राजळे यांनी सहभाग घेतला.
थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रसाठी ८ मे या जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ हे राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात आले असल्याचे राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
कमी प्रमाणात थॅलेसेमिया असलेल्या पती-पत्नीच्या जोडीतून होणाऱ्या बाळाला थॅलेसेमिया गंभीर होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णांची विवाहपूर्व किंवा गर्भधारणेपूर्वी चाचण्या होणे अत्यंत आवश्यक आहे. परभणी येथे नऊ बालकांना थॅलेसेमियापासून वाचवण्यात यश आले आहे. या बालकांवर केलेल्या उपचारा पद्धतीची कृती आरखडा तयार करून त्यानुसार राज्यात कार्यवाही केली जाईल, असेही श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
राज्यमंत्री श्रीमती साकोरे- बोर्डीकर यांनी सांगितले, कोल्हापूर जिल्ह्यात थॅलेसेमिया तपासणी, उपचारासाठी जी पद्धत वापरण्यात येत आहे, या कार्यपद्धतीवर आधारित कृती आरखडा करुन ती देखील संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली जाईल. या बरोबरच राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत या आजाराबाबत प्रशिक्षण व आजाराच्या उपचाराबाबत माहिती दिली जाईल. थॅलेसेमिया रुग्णांना औषधाचा तुटवडा भासू नये यासाठी आवश्यकतेनुसार औषधांचा साठा केला जाईल. थॅलेसेमिया गंभीर रुग्णांसाठी राज्य शासनाकडून अनेक सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये मोफत रक्त पुरवठा, खासगी रक्तपेढ्यांतूनही मोफत रक्त उपलब्ध, एसटी प्रवास मोफत देण्यात येत आहे. तसेच अशा रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही राज्यमंत्री श्रीमती सकोरे -बोर्डीकर यांनी सांगितले.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/