पंढरपूर, दि ३ :- आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची पाहणी केली तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली.
तसेच यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कारही मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला.
यावेळी आमदार समाधान आवताडे, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते.
चौफाळा ते मंदिर उपमुख्यमंत्री गेले चालत
चौफळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने मंत्री महोदय तसेच राज शिष्टाचार नुसार अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समिती मार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता. भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिर पर्यंत दर्शनासाठी चालत गेले.
00000