‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

जळगावच्या ‘ह्युमन मिल्क बँके’तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार

आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध पाजू शकत नाही – आजारपण, अति कमी वजनाचं बाळ, किंवा अगदी अनाथत्व. अशा वेळी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे त्या नवजातासाठी जीवदान ठरतं. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) ‘ह्युमन मिल्क बँक’ हे त्याचं अत्युत्कृष्ट उदाहरण ठरतं आहे.

मार्च २०२४ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात आजपर्यंत १८४६ मातांनी स्वखुशीने दुग्धदान केलं असून, २००० हून अधिक नवजात बाळांना सुरक्षित, आरोग्यदायी दूध मिळालं आहे.

 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली, पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी यांना संकल्पना आवडली, तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या पुढाकारातून झाली. “मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही पर्याय स्वीकारण्यासारखा नसतो. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम उभा राहिला आहे,” असं डॉक्टर पाटील सांगतात.
“मातेचे दूध म्हणजे फक्त अन्न नव्हे, ती जीवनरेषा आहे” – असे सांगत प्रमुख जयश्री पाटील आणि डॉ. शैलजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत मिल्क बँकची पाच सदस्यीय टीम समुपदेशन व सेवा कार्यात समरस आहे.

‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे काय?

‘ह्युमन मिल्क बँक’ ही अशा प्रकारची सुविधा आहे जिथे नवजात बाळांसाठी आईच्या दुधाचा पर्याय म्हणून दुसऱ्या आरोग्यदायी स्त्रीचे दूध गोळा करून सुरक्षितरीत्या साठवले जाते आणि गरजूंना दिले जाते. ही संकल्पना विशेषतः अशा बाळांसाठी उपयुक्त ठरते, ज्यांच्या मातेला कोणत्याही कारणामुळे थेट स्तनपान करता येत नाही — जसे की अकाली बाळंतपण, आईचे आजारपण, मृत्यूनंतर किंवा दूध कमी असणे इत्यादी.

कशी कार्य करते ह्युमन मिल्क बँक?

1. दुग्धदान (Milk Donation):
निरोगी स्त्रियांनी (आईंनी) त्यांच्या बाळाला दूध पाजून उरलेले दूध स्वेच्छेने या बँकेत दान केले जाते. त्यासाठी महिलांची वैद्यकीय तपासणी होते, त्यांच्या आरोग्याचा इतिहास तपासला जातो.

2. दूध संकलन व तपासणी:
संकलित दूध हे प्रमाणित प्रक्रियेनुसार पाश्चराइज (अती उष्ण व अती शीत)केले जाते. त्यामुळे त्यातील जंतू, बॅक्टेरिया नष्ट होतात.

3. साठवण व वितरण:
हे दूध विशेष थंड तापमानात डीप फ्रीझरमध्ये साठवले जाते. गरजूंना – विशेषतः NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मधील कमी वजनाच्या बाळांना – डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते.

का आहे ही गरज?
अनेक वेळा अकाली जन्मलेल्या किंवा कमकुवत बाळांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनासाठी आईचे दूधच सर्वोत्तम असते.

पण काही प्रसंगी आई दूध देऊ शकत नाही, अशा वेळी दुसऱ्या महिलांचे दूध अत्यावश्यक ठरते. हे दूध बाळाच्या जीवितासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे “ह्युमन मिल्क बँक” म्हणजेच आईच्या मायेचा एक सामाजिक विस्तार म्हणता येईल.

फायदे:
▪️ बाळाचा आरोग्य विकास योग्य होतो.

▪️ मृत्यू दरात घट येते.

▪️ स्तनपानास प्रोत्साहन मिळते.

▪️ आईच्या अनुपस्थितीतही बाळाला आईच्या दुधासारखे पोषण मिळते.

ह्युमन मिल्क बँक ही विज्ञान, सेवा आणि मातृत्व यांचा सुंदर संगम आहे. ती म्हणजे एक जीवनदायिनी यंत्रणा आहे – बाळांच्या आरोग्याचे रक्षण करणारी!

युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव