शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

उजनी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण

नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे, असे  प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकटे यांनी केले.
आज सिन्नर तालुक्यातील उजनी येथील 33/11 केवव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंता अनिल झटकरे,  कार्यकारी अभियंता (स्थापत्य)  शीतलकुमार घुमे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) सुनिल काळोलीकर, उप कार्यकारी अभियंता विठ्ठल हरक, सहाय्यक अभियंता स्थापत्य कृष्णा थोरात, दिनेश राजपूत, वैभव पवार, सरपंच निवृत्ती सापनर  यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, यापूर्वी पूर्व भागातील पांचाळे, उजनी, दहिवाडी व सांगावी परिसरातील शेतकरी व ग्राहक यांना विजेच्या समस्या उद्भवत होत्या. परंतु आज कार्यान्वित झालेल्या 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या माध्यमातून  वीजपुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे  शेतकरी व  ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
 नवीन कृषी धोरणाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक विकासात्मक योजना राबविण्यात येणार आहेत. वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील गावांसाठी थ्री-फेज व वाडी- वस्त्यांसाठी सिंगल-फेज विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा नवनवीन शेती साधनांद्वारे  उत्पादक खर्च कमी करून शेतीतील उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. आपत्ती पासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र स्थापित करण्यात येणार असल्याचे मंत्री कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
000000