मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीसाठी कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणीच हे कार्यालय सुरू राहणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच सद्यस्थितीत असलेल्या कार्यालयाची डागडुजी ठराविक कालमर्यादेत करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अल्पसंख्याक विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत अल्पसंख्याक मंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार अमिन पटेल, रईस शेख, सना मलिक, महाराष्ट्र वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, अध्यक्ष समीर काझी, उपसचिव मिलिंद शेणॉय, अवर सचिव विशाखा आढाव आदीसह अधिकारी उपस्थित होते.
अल्पसंख्याक मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले की, मुंबईत फोर्ट परिसरातील उर्दू साहित्य अकादमीची जागा ही अल्पसंख्याक विभागाच्या मालकीची असून, कार्यालयासाठी पर्यायी जागा शोधून अहवाल सादर करावा. तसेच, उर्दू आणि मराठी भाषांतील साहित्याचे सौंदर्य व साम्य अधोरेखित करण्यासाठी अधिकाधिक साहित्याचे भाषांतर या अकादमीमार्फत करण्यात यावे.
तसेच अकादमी मधील, मार्टि आणि आयुक्तालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रियाही गतीने राबवावी. वक्फ बोर्डाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. वक्फ बोर्डांतर्गत सुरू असलेल्या सुनावण्या आणि त्यांचे निकाल पोर्टलवर जनतेसाठी उपलब्ध करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
000
श्रद्धा मेश्राम/विसंअ/